08 March 2021

News Flash

सर्वच पक्षांचा ‘मराठी चेहरा’ !

बिगरमराठी नेत्याला संधी दिल्यास त्याचा फारसा उपयोग होत नाही हे लक्षात आल्यानेच बहुधा काँग्रेस, राष्ट्रवादीपाठोपाठ आता भाजपनेही मुंबईची सूत्रे मराठी नेत्याकडे सोपविली आहेत. गेल्या वर्षी

| June 12, 2013 03:09 am

बिगरमराठी नेत्याला संधी दिल्यास त्याचा फारसा उपयोग होत नाही हे लक्षात आल्यानेच बहुधा काँग्रेस, राष्ट्रवादीपाठोपाठ आता भाजपनेही मुंबईची सूत्रे मराठी नेत्याकडे सोपविली आहेत. गेल्या वर्षी महापालिका निवडणुकीच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व बिगर मराठी नेत्याकडे असल्यामुळेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मराठी मतांवर परिणाम झाला होता. त्यातून बोध घेत आता सर्वच राजकीय पक्षांनी मुंबईतील पक्षसंघटनेचे नेतृत्व पुन्हा मराठी नेत्यांकडे सोपविले आहे.  
मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी राज पुरोहित यांच्याऐवजी आशिष शेलार यांची सोमवारी नियुक्ती करण्यात आली. अलीकडेच काँग्रेसने मुंबईच्या अध्यक्षपदी जनार्दन चांदूरकर यांची नियुक्ती केली होती. त्याआधी राष्ट्रवादीने मुंबईच्या अध्यक्षपदी खासदार संजय दिना पाटील यांची नेमणूक केली. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा उचलून धरल्यापासून काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या मराठी मतांवर लक्षणीय परिणाम होऊ लागल्यामुळेच मराठी चेहरा पुढे करण्यावर सर्वच राजकीय पक्षांना भर द्यावा लागला.
गेल्या वर्षी महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी मुंबई काँग्रेसची सूत्रे कृपाशंकर सिंग यांच्याकडे होती. कृपाशंकर सिंग म्हणजे मुंबईतील उत्तर भारतीयांचे मसीहा असल्याने मराठी मतांवर त्याचा साहजिकच परिणाम झाला. कोणत्याही पक्षाशी एकनिष्ठ नसेलली मते प्रत्येक निवडणुकीत लाटेवर स्वार होतात, त्यातूनच मराठी मते काँग्रेसपासून दूर गेली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मात्र, मराठी मतांवर परिणाम होऊ नये म्हणून मुंबई काँग्रेसची सूत्रे मराठी नेत्याकडे असली पाहिजेत यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा कटाक्ष होता. मराठी नेत्याकडेच मुंबईची सूत्रे सोपविली गेली पाहिजेत हे मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पटवून दिले होते. त्यातूनच चांदूरकर यांची वर्णी लागली. राष्ट्रवादीचे नेतृत्न नरेंद्र वर्मा यांच्याकडे होते. काँग्रेसप्रमाणेच राष्ट्रवादीलाही पारंपरिक वगळता फारशी मराठी मते मिळाली नव्हती. राष्ट्रवादीने म्हणून मुंबईच्या अध्यक्षपदी खासदार संजय दिना पाटील यांची नियुक्ती केली. अध्यक्षपदी निवड झाल्यापासून मुंबईत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या वतीने विविध कार्यक्रम राबविण्याबरोबरच आंदोलने सुरू केली. राष्ट्रवादीच्या इतिहासात प्रथमच मुंबईत मोठा मोर्चा निघाला.
गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुंबईत भाजपला पारंपारिक वगळता मराठी मते तेवढी मिळाली नव्हती. युती असताना मराठी मतदारांनी शिवसेनेच्या उमेदवाराला मते दिली, पण भाजपचा उमेदवार असलेल्या ठिकाणी मनसेला मतदान झाले होते. मराठी मते मनसेकडे जाणे हे भाजपच्या दृष्टीने चिंताजनक आहे. यामुळेच भाजपनेही मुंबईत मराठी चेहरा पुढे केला आहे.  मुंबईत फक्त बिगर मराठी मतांवर निवडणूक जिंकणे कठीण जाते हा अनुभव काँग्रेस व भाजपला आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2013 3:09 am

Web Title: all parties has marathi face
टॅग : Marathi,Political Party
Next Stories
1 प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाची पहिली यादी जाहीर
2 रेसकोर्सच्या कराराचे घोडे आणि पारदर्शकतेचा लगाम!
3 जेईई-अ‍ॅडव्हान्सच्या उत्तरतालिका आणि उत्तरपत्रिका संकेतस्थळावर जाहीर
Just Now!
X