18 September 2020

News Flash

भररस्त्यातील मंदिरासाठी मालाडमध्ये सर्वपक्षीय एकत्र

वाहतुकीला अडथळा ठरणारे वादग्रस्त हनुमान मंदिर वाचवण्यासाठी सर्वपक्षीय मंडळी सरसावली

मालाड पश्चिमेला भररस्त्यात असलेल्या हनुमान मंदिराचा काही भाग गुरुवारी हटवण्यात आला.   (छायाचित्र : दिलीप कागडा)

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर कारवाई लांबणीवर

मालाड रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेडील वाहतुकीला अडथळा ठरणारे वादग्रस्त हनुमान मंदिर वाचवण्यासाठी सर्वपक्षीय मंडळी सरसावली असून सुमारे ७० वर्षे जुने मंदिर तोडू नये, असा आग्रह धरण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने बेकायदा प्रार्थनास्थळे तोडण्यासाठी दिलेली मुदत अवघ्या २४ तासांत संपणार असताना राजकीय नेतेमंडळींच्या आग्रहानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मंदिराबाबत येत्या १५ दिवसांत निर्णय घेण्याच्या सूचना केल्या आहेत. मंदिरावरील कारवाई तूर्त टळली असली तरी, गुरुवारी मंदिराच्या वरच्या बाजूचा काही भाग हटवण्यात आला.

रस्त्यात अडथळा ठरणारी सर्व अनधिकृत प्रार्थनास्थळे १७ नोव्हेंबपर्यंत हटविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार शहरातील प्रार्थनास्थळांवर पालिकेतर्फे कारवाई केली जात आहे. पालिकेच्या यादीत मालाड पश्चिम स्थानक परिसरात रस्त्याच्या मधोमधच असलेल्या हनुमान मंदिराचाही समावेश आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हे मंदिर १९४८ पासून येथे अस्तित्त्वात आहे. त्यामुळे पालिकेच्या कारवाईच्या यादीत या मंदिराचाही समावेश असल्याचे कळताच स्थानिक रहिवाशांसह, सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी एकत्र येत मंदिर वाचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी काही दिवसांपूर्वीच पालिका आयुक्त अजोय मेहता व महापौर विश्वनाथ महाडेश्वर, उपनगराचे पालकमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन मंदिरावर कारवाई करण्यात येऊ नये अशी विनंती केली होती. मात्र, न्यायालयाचे आदेश असल्याने कारवाई मागे घेता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आल्यानंतर हे मंदिर अन्यत्र हलवण्यास लोकप्रतिनिधींनी संमती दर्शवली. मंदिरासमोरील पोलीस चौकी शेजारील मोकळ्या जागेत मंदिर स्थलांतर करावे अशी मागणी आहे. शुक्रवापर्यंत मंदिरावर कारवाई करणे आवश्यक आहे. परंतु, स्थलांतराला अवधी मिळावा यासाठी उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी स्थानिक नागरिकांसह गुरुवारी रात्री उशिरापर्यंत मंदिर परिसरात आंदोलन केले. हे मंदिर हे ‘अ’ श्रेणीत असतानाही त्याचा अहवाल राज्य सरकारकडे न पाठवता पालिकेच्या अधिकाऱ्यांनी  परस्पर कारवाईचा निर्णय घेतला आहे, असा त्यांचा आक्षेप आहे. गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांनी  कारवाई रोखण्याची मागणी केली.

रस्ता मोकळा होणार

मालाड स्थानकातून बाहेर पडताच रस्त्याच्या मधोमध हे मंदिर येते. आधीच अरुंद असलेल्या या रस्त्यातून वाहन नेताना चालकांना प्रचंड वाहतुककोंडीला सामोरे जावे लागते. मंदिर स्थलांतर केल्यास रस्ता मोकळा होऊन पादचारी व वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. याबाबत ‘पी उत्तर’ विभागाच्या सहाय्यक आयुक्त संजोग कबरे यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2017 1:40 am

Web Title: all parties together in malad to stop demolition of hanuman temple
Next Stories
1 एसटीचे दळणवळण व्हॉट्सअ‍ॅपवरही
2 ऑनलाइन दहशतवादाचा सामना करण्यासाठी फेसबुकचा पुढाकार
3 मेट्रोचे तिकीट आता अ‍ॅपवर
Just Now!
X