दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर आता विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यंदा दहावीत असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाची म्हणजे अकरावीची संधी देण्याचा विचार करण्यात येत आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, शिक्षण विभागातील अधिकारी, तज्ज्ञ यांच्या बुधवारी झालेल्या बैठकीत दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन आणि अकरावी प्रवेशासाठीच्या विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली.

केंद्रीय मंडळांनंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानेही राज्यातील विद्यार्थ्यांच्या दहावीची परीक्षा रद्द केली. आता दहावीच्या सर्वच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण अशा मापात न तोलता पुढील शिक्षणाची संधी देण्याचा विचार शिक्षण विभाग करत आहे. त्यानुसार सर्वच विद्यार्थी अकरावी किंवा अनुषंगिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरतील. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना पुढील विविध टप्प्यांवर दहावीचे गुण दाखवावे लागतात त्यांना श्रेणीसुधारण्यासाठी संधी देता येईल का याबाबतही चाचपणी करण्यात येत आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करावे आणि अकरावीचे प्रवेश कोणत्या आधारे करावेत असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्या अनुषंगाने पुढील योजना ठरवण्यासाठी गायकवाड यांनी बुधवारी अधिकारी, तज्ज्ञ आणि सल्लागार समिती सदस्यांची एकत्रित बैठक घेतली. त्यात विविध उपाय आणि मुद्द्यांवर चर्चा झाली.

बाहेरून बसणारे आणि फेरपरीक्षार्थींचा प्रश्न

दहावीची परीक्षा बाहेरून देणारे विद्यार्थी, फेरपरीक्षार्थी यांचे मूल्यमापन कसे करावे, याबाबत प्रशद्ब्रा निर्माण झाले आहेत. या विद्यार्थ्यांनाही अकरावीसाठी प्रवेश देऊन नंतर ठराविक कालावधीत दहावीची परीक्षा देण्याची संधी देण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.

शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी, राज्य मंडळाची परीक्षा सल्लागार समितीशी दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन, अकरावीचे प्रवेश यांबाबत चर्चा केली. यानंतरही शिक्षक आणि विविध घटकांशी चर्चा करून लवकरच ठोस निर्णय जाहीर केला जाईल. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, त्यांना अकरावीला प्रवेश मिळावेत, पुढील शैक्षणिक वाटचालीत काही अडचणी येऊ नयेत, याची काळजी घेण्यात येईल.

-वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री