News Flash

आरोपींच्या सुटकेचे सर्व मार्ग बंद

सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना कुठल्याच कच्च्या दुव्याचा आधार मिळू नये, यासाठी पोलिसांनी परिपूर्ण आरोपपत्र तयार केले आहे.

| September 20, 2013 01:27 am

सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना कुठल्याच कच्च्या दुव्याचा आधार मिळू नये, यासाठी पोलिसांनी परिपूर्ण आरोपपत्र तयार केले आहे. कायद्याच्या नवीन तरतूदीचा वापर करून पोलिसांनी हे आरोपपत्र तयार केले आहे. तसेच पहिल्या प्रकरणात आरोपींना शिक्षा झाल्यास दुसऱ्या बलात्कार प्रकरणात त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्याची मागणीही करता येऊ शकणार आहे.
शक्ती मिलमध्ये दोन तरुणींवर सामूहिक बलात्कार झाले. त्यातील कासम बंगाली, सिराज रेहमान आणि विजय जाधव या आरोपींचा २२ ऑगस्टच्या आणि ३१ जुलैच्या अशा दोन्ही सामूहिक बलात्कारांमध्ये सहभाग होता. २२ ऑगस्टच्या छायाचित्रकार तरुणीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी त्यांच्यावर ३७६ (ड) हे कलम लावले आहे. या कलमांनुसार आरोपींना जास्तीत जास्त म्हणजे आजीवन कारावासाची शिक्षा होऊ शकते. या तीन आरोपींना छायाचित्रकार तरुणीच्या प्रकरणात शिक्षा झाली तर दुसऱ्या सामूहिक बलात्कार प्रकरणात त्यांच्यावर ३७६ (जी) हे कलम लावता येऊ शकेल. दुसऱ्या बलात्काराचा खटला सुरू असेल तरी खटल्याच्यावेळी सुद्धा ३७६ (जी) हे कलम लावता येऊ शकते. या कलमानुसार आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी, अशी मागणी करता येईल असे सहपोलीस आयुक्त हिमांशू रॉय यांनी सांगितले.  
दिल्ली सामूहिक बलात्काराच्या प्रक्षोभानंतर दोन महिन्यांपूर्वी नव्याने अंमलात १६४ (५) (२) या कलमानुसार पोलिसांनी पीडित तरुणीचा जबाब नोंदविला आहे. न्यायदंडाधिकाऱ्यासमोर हा जबाब नोंदविला गेला आहे. खटल्याच्या वेळी पीडित तरुणी गैरहजर राहिली, तिचे मतपरिवर्तन झाले किंवा ती अन्य कारणाने न्यायालयासमोर येऊ शकली नाही, तरी या कलमानुसार तिने दिलेला जबाब ग्राह्य मानून खटला सुरू राहणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2013 1:27 am

Web Title: all the way close for shakti mills rapists
Next Stories
1 सुबुद्धीचे विसर्जन
2 दाभोलकरांची हत्या शासन पुरस्कृत?
3 १७वा पद्मश्री दया पवार पुरस्कार जाहीर
Just Now!
X