देशभर खळबळ उडालेल्या शीना बोरा हत्याकांडाचा गुंता शुक्रवार संध्याकाळपर्यंत उलगडला नव्हता. मुंबई पोलिसांनी पेणला जाऊन शीनाच्या सांगाडय़ाचे काही अवशेष ताब्यात घेतले. तर शीनाचा सध्याचा पती पीटर मुखर्जी, मुलगा मिखाईल यांचे जबाब नोंदवले. इंद्राणीचा दुसरा पती संजीव खन्ना याला कोलकात्याहून मुंबईत आणल्यानंतर न्यायालयात हजर केले. त्याला ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. शीना ही इंद्राणीच्या पहिला पती सिद्धार्थ दास याच्यापासून झालेली मुलगी असल्याचे मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
शीना बोरा हत्या प्रकरणात मुंबईच्या खार पोलिसांनी तिची आई इंद्राणी, वाहनचालक श्याम राय आणि इंद्राणीचा दुसरा पती संजीव खन्ना या तिघांना अटक केली आहे. शुक्रवारी दुपारी खन्नाला वांद्रे न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्याकडून पारपत्र आणि व्हिसा हस्तगत करण्यात आला. चौकशीसाठी खन्नाला पोलीस कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी केली. न्यायालयाने त्याला ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली. शुक्रवारी सर्व आरोपींची अज्ञातस्थळी पुन्हा एकत्र चौकशी करण्यात आली. मात्र पोलिसांनी त्याबाबत आजही मौन बाळगलं होते.

शीना ही सिद्धार्थ दास याचीच मुलगी
शीना नेमकी कुणाची मुलगी, असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु शुक्रवारी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने शीना ही इंद्राणीचा पहिला पती सिद्धार्थ दास याचीच मुलगी असल्याचे सांगितले. वेळ पडल्यास त्याला मुंबईत आणून जबाब नोंदविला जाईल असेही सांगितले.

पीटर मुखर्जी, मिखाईलचे जबाब : इंद्राणीचा सध्याचा तिसरा पती पीटर मुखर्जी शुक्रवारी संध्याकाळी खार पोलीस ठाण्यात आले. इंद्राणीचा मुलगा आणि शीनाचा भाऊ मिखाईल सुद्धा गुवाहाटीवरून मुंबईत आला होता. तो सुद्धा संध्याकाळी खार पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्याचा जबाब नोंदविण्यात आला.