बदनामीसाठी  वापर – राष्ट्रवादीचा आरोप ;परब व राऊत यांच्या चौकशीची भाजपची मागणी

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात ‘केंद्रीय गुन्हे अन्वषेण विभागाने (सीबीआय) दाखल के लेला गुन्हा आणि त्यांच्या निवासस्थानावर पडलेल्या छाप्यानंतर राजकीय बदनामीसाठीच भाजपकडून सीबीआयचा वापर के ला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने के ला. तर काहीजण जात्यात तर काही सुपात आहेत. हे फार दिवस चालणार नाही, असे सूचक वक्तव्य करीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांची सीबीआयकडून, तर शिवसेना खासदार संजय राऊत यांची राष्ट्रीय महिला आयोगाकडून चौकशीची मागणी केली.

छाप्यांचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी अनिल देशमुख यांच्यावरील छाप्यांचा तीव्र निषेध केला आहे.

सत्तेचा दुरुपयोग करून सरकारला बदनाम केले जात आहे. माजी गृहमंत्र्यांना बदनाम करणे हा सगळा खेळ सुरू आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. खरे काय आहे ते बाहेर येईलच आणि जे राजकारण सुरू आहे ते जनतेसमोर उघड होईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही ‘कु छ तो गडबड है’ असे ट्वीट करत सीबीआयच्या छाप्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित के ले. सीबीआयला उच्च न्यायालयाने काही आदेश दिले आहेत. सीबीआय त्यानुसार काम करत असेल. यात राजकीय सूडबुद्धीचा प्रकार नसावा असे मी मानतो. पण जर तसे काही असेल, तर  सरकार म्हणून आम्ही यासंदर्भात भूमिका घेऊ, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

भाजपकडून प्रत्युत्तर

सीबीआयला तपासात काही आक्षेपार्ह आढळले असल्यानेच अनिल देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असावा, असे प्रत्युत्तर भाजपने महाविकास आघाडीच्या आरोपांवर दिले आहे.   न्यायालयाच्या आदेशाचा सोयीस्कर अर्थ लावण्यापेक्षा यंत्रणा आणि कायद्यावर विश्वास ठेवा, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिला आहे.  अनिल देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. याबरोबरच परिवहनमंत्री अनिल परब यांनी मुंबई महापालिकेच्या पन्नास कंत्राटदारांकडून शंभर कोटी रुपये गोळा करण्याची सूचना दिली होती, असा आरोप निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी केला आहे. त्यावर परब यांनी खुलासा केला असला तरी सीबीआय चौकशी झाल्यानंतरच त्यातील सत्य बाहेर येईल. वाझे याच्या पत्रात घोडावत नावाच्या एका व्यक्तीचा उल्लेख आहे. घोडावत याचीही सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.