लोकमान्य टिळक रुग्णालयाने मूल बदलल्याचा महिलेचा आरोप अखेर खोटा ठरला आहे. न्यायवैद्यक प्रयोगशाळेत केलेल्या डीएनए चाचणीनुसार मृत नवजात मुलगी त्याच महिलेची असल्याचे सिद्ध झाले आहे. रुग्णालयाने आपला मुलगा बदलून मृत मुलगी दिल्याचा आरोप या महिलेच्या कुटुंबियांनी केला होता.
धारावी येथे राहणारी समिना शेख (३०) ही महिला बाळंतपणासाठी लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल झाली होती. तिचा पती चोरीच्या आरोपाखाली तुरुंगात आहे. २८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता ती बाळंत झाली. मात्र तिची मुलगी जन्मताच मरण पावली होती. दुपारी तिच्या कुटुंबियांकडे हे बाळ सुपूर्द करण्यात आले. मात्र समिनाला मुलगा झाला होता आणि रुग्णालयाने ही मृत मुलगी दिल्याचा दावा तिच्या नातेवाईकांनी केला होता.
शीव पोलिसांनी याप्रकरणी डीएनए नमुने तपासणीसाठी कलिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवले होते. सोमवारी त्याचा अहवाल प्राप्त झाला आणि ती नवजात मुलगी समिनाचीच असल्याचे स्पष्ट झाले.
या अहवालामुळे मुल बदली केल्याचा महिलेचा दावा खोटा असल्याचे शीव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) दत्तात्रय गिरम यांनी सांगितले. जर रुग्णालयाने तक्रार दिली तर सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याप्रकरणी महिलेवर तक्रार होऊ शकते असेही पोलिसांनी सांगितले.
रुग्णालय मात्र या प्रकरणा कुठलीही तक्रार करणार नसल्याचे सांगण्यात आले.