परदेशी वृत्तपत्राने केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’मध्ये अडकलेला भारताचा माजी क्रिकेटपटू सोबर्स जोबन आणि मुंबई गुन्हे शाखेने गजाआड केलेला भामटा विजय बराते एकाच बेटिंग रॅकेटचे मोहरे आहेत. आयपीएलच्या धर्तीवर ठिकठिकाणी स्पर्धा आयोजित करून कोटय़वधींचे बेटिंग घडवून आणण्यासाठी हे दोघे अनेक बुकींच्या संपर्कात होते, असा संशय मुंबई गुन्हे शाखेला आहे.

लंडनमधील ‘द सन’ या वृत्तपत्राने दुबई, दिल्ली येथील हॉटेलमध्ये जोबनवर स्टिंग ऑपरेशन केले. यावेळी जोबनसोबत त्याचा भागीदार आणि व्यावसायिक प्रियांक सक्सेना उपस्थित होता. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड या कट्टर प्रतिस्पध्र्यामध्ये सुरू असलेल्या अ‍ॅशेस कसोटी मालिकेतील स्पॉट फिक्सिंग, एका सत्रात होणारी धावसंख्या, कोणत्या षटकात कोटय़वधींचे बेटिंग घेणे शक्य होईल, कोणते खेळाडू फिक्स असतील, सामन्यादरम्यान खेळाडूंकडून मिळणारे संकेत देण्याचे या दोघांनी आपल्या वार्ताहरासमोर कबूल केल्याचा दावा द सनने केला. ही माहिती देण्याच्या बदल्यात दोघांनी लाखो पाउंडची मागणी केली. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान संघांतील महत्त्वाचे खेळाडूंशी चांगला संपर्क आहे. आम्ही सांगू तसे ते वागतील, असे या दोघांनी छातीठोकपणे सांगितल्याचा दावा द सन करते. या स्टिंग ऑपरेशननंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने चौकशी सुरू केल्याचे समजते.

दरम्यान, मुंबईसह महाराष्ट्रातील नवोदित क्रिकेटपटूंना आयपीएल, रणजी सामन्यांमध्ये संधी देतो असे सांगत फसवणाऱ्या बारातेच्या मोबाईल तपासणीतून तो आणि सक्सेना यांच्यातील संपर्क सर्वाधिक असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. पंजाबमधील बुकी चेतन महाजन या दोघांच्या संपर्कात होता. या प्रकरणाच्या तपासातून देशभरातील छोटेबडे बुकी, स्थानिक क्रिकेट मालिकांचे आणि शिबिर भरवून गुणवत्ता असलेले खेळाडू शोधणारे ही साखळी बराते, सक्सेनाच्या संपर्कात होती, अशी माहिती गुन्हे शाखेला मिळाल्याचे समजते. धक्कादायक बाब ही की बारातेला अटक झाल्यानंतर अवघ्या काही तासांत सक्सेनाने गुन्हे शाखेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तसेच बारातेला भेटू द्यावे ही विनंती घेऊन तो मुंबईतही आला. मात्र गुन्हे शाखेने त्याला हटकले. बरातेप्रमाणेच जोबन यानेही दिल्लीतील नवोदित क्रिकेटपटूंना विविध स्पर्धामध्ये संधी देण्याच्या नावाखाली गंडा घातल्याच्या तक्रारी बीसीसीआयकडे गेल्या होत्या.

बरातेच्या अटकेनंतर बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक समितीचे दोन सदस्य मुंबईत आले होते. त्यांनी बरातेकडे दिवसभर चौकशी केली. बरातेचा संपर्क हे त्यांच्या चौकशीची मूळ होते. लोकसत्ताला मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआयच्या सदस्यांनी जोबन, सक्सेना या दोघांबाबत बरातेकडे बरीच चौकशी केली. हे दोघे दिल्लीचे आहेत. जोबनने हिमाचलप्रदेश आणि दिल्ली संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्याचे वडील बलजीतसिंग हेही माजी क्रिकेटपटू असून दिल्लीत लालबहाद्दूर शास्त्री प्रशिक्षण केंद्र चालवतात.

नवोदित खेळाडूंना आमिष दाखवून आपल्या प्रभावाखाली घ्यायचे. स्थानिक पातळीवर आयपीएलसारख्या स्पर्धांचे आयोजन करायचे. एखाद्या वाहिनीसोबत स्पर्धेच्या प्रक्षेपण करार करायचा. स्पर्धेतील सामने वाहिनीवर दिसू लागले की त्याद्वारे कोटय़वधींचे बेटिंग होईल अशी व्यवस्था करून देणारे हे मोठे रॅकेट असावे, असा संशय गुन्हे शाखेला आहे.