‘सोयीच्या युती’ची भूमिका सेनेला अमान्य

मुंबई, ठाणे, पुण्यासह ११ महापालिका व २६ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये युती करण्यासाठी भाजपकडून शिवसेनेला पुढील आठवडय़ात प्रस्ताव दिला जाईल, असे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. मात्र युतीबाबत चर्चेचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्याची भाजपची भूमिका असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ज्या ठिकाणी भाजपची ताकद कमी आहे, तेथे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला टक्कर देण्यासाठी शिवसेनेची मदत घ्यायची व जेथे गरज नसेल, तेथे स्वबळावर लढायचे, अशी भाजपची खेळी आहे. मात्र युती करायची असल्यास सर्व महापालिका व जिल्हा परिषदांमध्ये केली जाईल आणि त्याचा निर्णय प्रदेश पातळीवरच होईल, अशी शिवसेनेची भूमिका असल्याचे सूत्रांनी सांगितले.

राज्यात शिवसेनेच्या पाठिंब्यावर सरकार असल्याने चर्चेची औपचारिकता तरी पार पाडणे आणि शक्य झाल्यास भाजपला जेथे स्वबळावर सत्ता मिळविणे अवघड आहे, तिथे युती करून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला रोखणे, अशी भाजपची खेळी आहे. शिवस्मारकाच्या भूमिपूजनानिमित्ताने भाजपने मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन करून शिवसेनेला जागाही दाखवून दिली व स्वबळावर लढण्याचीही तयारी सुरू केली आहे. मुंबईत ताकद वाढल्याने भाजपला निम्म्या जागांची अपेक्षा असून त्या देण्याची शिवसेनेची तयारी नाही. पण ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड येथे भाजपला युतीची गरज वाटत आहे. विदर्भात भाजपची ताकद वाढली असल्याने तेथे त्यांना शिवसेनेची फारशी आवश्यकता नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर चर्चा करून जागावाटप व युतीचे निर्णय घ्यावेत, असा प्रस्ताव भाजपकडून औपचारिकपणे शिवसेनेला देण्याचे ठरविण्यात आले आहे.

आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात राज्य निवडणूक आयोगाकडून होणे अपेक्षित आहे. त्यामुळे स्वबळाचे नारे दिले व तयारी सुरू केली असली तरी भाजपने युतीसाठी चर्चा सुरू करण्याचे ठरविले आहे.