बोरिवली-विरार मार्गिकावाढसह पाच प्रकल्प रेल्वे महामंडळाकडे

मुंबई : ‘मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रकल्प-३ ए’मधील (एमयूटीपी) प्रकल्पांचे रेल्वे मंडळाकडून वाटप करण्यात आले असून ‘मुंबई रेल्वे विकास महामंडळा’च्या (एमआरव्हीसी) शिरावर बोरिवली-विरार पाचवा-सहावा मार्ग, उपनगरीय रेल्वेची सिग्नल यंत्रणा आधुनिक करणाऱ्या ‘सीबीटीसी’सह पाच महत्त्वाच्या प्रकल्पांची जबाबदारी टाकण्यात आली आहे, तर पश्चिम रेल्वेकडे हार्बरचे बोरिवलीपर्यंतचे विस्तारकाम आणि मध्य रेल्वेकडे कल्याण ते आसनगाव चौथा मार्ग, कल्याण यार्डचे काम सोपवण्यात आले आहेत. कामाच्या जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आल्याने ‘एमयूटीपी-३ए’मधील प्रकल्पांना वेग येणार आहे.

मार्च, २०१९ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘एमयूटीपी-३ ए’मधील ५४ हजार कोटी रुपयांपैकी ३३ हजार ६९० कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी दिली. सीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद मार्ग आणि पनवेल ते विरार कॉरिडोर प्रकल्पांचा फेरआढावा घेण्याच्या मंत्रिमंडळाच्या सूचनेमुळे हे दोन्ही प्रकल्प प्रकल्प मागे पडले. उर्वरित प्रकल्पांचे रेल्वे मंडळाने मध्य, पश्चिम रेल्वे व एमआरव्हीसीत वाटप करण्याचे आदेश नुकतेच दिले. ‘एमआरव्हीसी’कडे सीएसएमटी ते पनवेल, सीएसएमटी ते कल्याण आणि चर्चगेट ते विरार या तीनही मार्गावर सीबीटीसी (कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल सिस्टीम) यंत्रणा पूर्ण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, तर १९३ वातानुकूलित लोकल गाडय़ांचे काम ‘एमआरव्हीसी’बरोबरच रेल्वेची चेन्नईतील आयसीएफ व रायबरेली कारखान्यांकडे देण्यात आले आहे. याशिवाय १९ रेल्वे स्थानकांमध्ये सुधारणा, कल्याण ते बदलापूर तिसरा व चौथा मार्ग, बोरिवली ते विरार पाचवा व सहावा मार्गाचे कामही त्यांच्या वाटय़ाला आले आहे.

पश्चिम रेल्वेकडे गोरेगाव ते बोरिवलीपर्यंत हार्बरच्या विस्ताराचे काम देण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मध्य रेल्वेकडे कल्याण ते आसनगाव चौथा मार्ग, कल्याण यार्डची एक्स्प्रेस आणि उपनगरीय गाडय़ांसाठी विभागणी प्रकल्पांचे काम सोपवण्यात आले आहे. या प्रकल्पांची विभागणी करण्यात आल्याने ते मार्गी लागणे सोपे जाईल. सध्या लोकसभा निवडणुका असल्याने या प्रकल्पांना महिनाभरानंतर वेग येईल, असे सूत्रांनी सांगितले.

‘सीबीटीसी’ म्हणजे काय?

ही डिजिटल सिग्नल यंत्रणा आहे. यामुळे मोटरमनला वेगासंदर्भात नियंत्रण कक्षाकडून झटपट सूचना मिळतात. तसेच पुढे धावत असणाऱ्या लोकल गाडय़ांसंदर्भातही सिग्नल मिळेल. यामुळे लोकल वेळेत धावणे शक्य होणार आहे. याचा आणखी एक फायदा म्हणजे लोकल फेऱ्यांची संख्याही वाढण्यात मदत मिळेल. सध्या दर चार मिनिटांनी सुटणाऱ्या लोकल फेऱ्या या यंत्रणेमुळे दोन मिनिटांनी सुटतील. त्यामुळे लोकल फेऱ्यांची संख्या ४० ते ५० टक्क्यांनी वाढेल. एमयूटीपी-३एमधील अन्य छोटय़ा प्रकल्पांमध्ये उपनगरीय गाडय़ांसाठी स्टेबल लाइन, उपनगरीय गाडय़ांची देखभाल दुरुस्ती व नवीन डबे आणि अन्य तांत्रिक कामे असे तीन प्रकल्प मध्य, पश्चिम रेल्वे व एमआरव्हीसी क्रमश: करतील.