News Flash

सर्वपक्षीय नेत्यांकडून रेमडेसिविर वाटप!

राज्य सरकारला साठा न देता भाजप रेमडेसिविरच्या वाटपाचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप होऊ लागला होता.

तबस्सूम बारनगरवाला, एक्स्प्रेस वृत्तसेवा

मुंबई : रेडमेसिविर इंजेक्शनवरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप रंगत असले तरी या इंजेक्शनच्या वाटपात सर्वच राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागली होती, असे स्पष्ट झाले आहे.

रेमडेसिविर साठेबाजीच्या आरोपप्रकरणी एका कंपनीच्या संचालकाला ताब्यात घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी पोलीस ठाणे गाठल्यानंतर रेमडेसिविरचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला. राज्य सरकारला साठा न देता भाजप रेमडेसिविरच्या वाटपाचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप होऊ लागला होता. मात्र, सत्ताधारी महाविकास आघाडीसह सर्वपक्षीय नेत्यांकडून रेमडेसिविरचे थेट वाटप झाल्याचे आढळून आले आहे. त्यातील अनेक नेते आपल्या मतदारसंघांत रेमडेसिविर पुरवठा करण्यासाठी तत्परता दाखवत असल्याचे दिसते.

दमणस्थित निर्यातदार ब्रुक फार्माला महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाकडून रेमडेसिविर पुरवठ्यासाठी १८ एप्रिलला परवानगी मिळण्याआधीच भाजपचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी या कंपनीकडून रेमडेसिविरची थेट खरेदी केली होती. त्यांनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात रेमडेसिविरच्या १५०० कुप्यांचे नंदूरबारमध्ये वाटप केले होते. ‘‘कंपनीकडे रेमडेसिविरचा साठा उपलब्ध होता. त्यांनी विक्री करण्याची तयारी दर्शवल्यानंतर मी ती गरजूंना विकण्याचा निर्णय घेतला’’, असे चौधरी यांनी सांगितले.

राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला दिलेल्या अधिकारानुसार नंदूरबार प्रशासनाने रेमडेसिविरच्या ५००० कुप्यांची खरेदी केली. त्यातील १००० कुप्या ‘सीएसआर’ फंडातून खरेदी करण्यात आल्या. नंदूरबारचे जिल्हाधिकारी  डॉ. राजेंद्र भारूड यांनी १००० कुप्या शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडे दिल्या. रघुवंशी यांनी अन्य वितरकांकडून कुप्या खरेदी करून त्या प्रत्येकी ५५० ते १२०० रुपयांना रोटरी वेलनेस सेंटरला दिल्या. भाजपच्या नंदूरबारमधील खासदार हिना गावित यांनी आक्षेप घेतल्यानंतर रोटरीचा पुरवठा थांबवण्यात आला. ‘‘मी चौकशी केली असता कुप्यांचा साठा रघुवंशी यांच्याकडे ठेवण्यात आला होता. एखादा राजकारणी असा साठा कसा काय करू शकतो’’, असा सवाल गावित यांनी केला. याबाबत चौकशीचीही मागणी त्यांनी केली. मात्र, कोणत्याही चौकशीस मी तयार असून, मी गरजू रुग्णांना कमी किमतीत रेमडेसिविर उपलब्ध करून दिले, असे रघुवंशी यांनी सांगितले.

एप्रिलच्या सुरूवातीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रेमडेसिविरच्या ७५ कुप्या सोलापूरला पाठवल्या. तिथे आमदार रोहीत पवार यांनी त्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी महेश गाडेकर आणि अन्य पदाधिकाऱ्यांकडे सोपवल्या. राष्ट्रवादी कॉंगे्रस पक्ष कल्याण निधीतून ही इंजेक्शन खरेदी करण्यात आली. ‘‘या कुप्या सोलापूर जिल्हा समितीकडे पाठवण्यास सांगण्यात आल्या होत्या. त्या गरजू रुग्णांसाठी खरेदी करण्यात आल्या’’, असे गाडेकर यांनी सांगितले. ‘‘ जिल्हा प्रशासनासाठी या कुप्या खरेदी करण्यात आल्या होत्या. त्या गरजू रुग्णांसाठी खरेदी करण्यात आल्या. त्यातून राजकीय लाभ मिळविण्याचा प्रश्नच नाही. पक्षाने औषधखरेदी थांबवली असून, आता कुप्या केवळ रुग्णालयांनाच मिळत आहेत’’, असे रोहीत पवार यांनी सांगितले. पक्षाध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

भाजप आमदार अमरीश पटेल यांनी आर. सी. पटेल जनेरिक स्टोअर्ससाठी रेमडेसिविर खरेदी केली. ‘‘आम्ही ७७५ प्रति कुपी या दराने खरेदी केली आणि गरजूंना त्याहून कमी किमतीत वितरित केल्या. रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठीच ही खरेदी केली’’, असे पटेल यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2021 2:12 am

Web Title: allocation of remdesivir injection by all party leaders akp 94
Next Stories
1 महाराष्ट्राला ४४ टन प्राणवायू
2 मुंबई महानगर क्षेत्रात १४ प्राणवायू निर्मिती प्रकल्पांची उभारणी
3 भारत पेट्रोलियम रिफायनरी परिसरात  करोना उपचार केंद्रास केंद्राची मंजुरी
Just Now!
X