News Flash

गंभीर आजाराच्या रुग्णांना रेल्वे प्रवासाची परवानगी द्या, अमित ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना देखील पाठवण्यात आले पत्र

गंभीर आजाराच्या वैद्यकीय उपचारासाठी प्रवास कराव्या लागणाऱ्या रुग्णांना आणि त्यासारख्या नातेवाईकांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी; अशी मागणी आग्रही मागणी मनसे नेते अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आलेल्या पत्रात अमित ठाकरे यांनी म्हटले आहे की, “मागील सहा महिन्यांच्या करोना लॉकडाउनच्या कालावधीत क्षयरोग, कर्करोग, यकृत, मूत्रपिंड, मेंदूविकार, अर्धांगवायू, मधुमेहासारख्या गंभीर आजाराने त्रस्त असणाऱ्या रुग्णांना उपचार घेण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. मागील सहा महिन्यात सर्वसामान्याची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. अशातच या आजारांवरील उपचारांचा खर्च लाखोंच्या घरात असतो. सध्या रुग्णांना उपचाराबरोबरच प्रवास खर्चाला तोंड द्यावे लागत आहे. असे अनेक आजार आहेत ज्यांच्या उपचारासाठी रुग्णांना आठवड्यातून दोन-तीन वेळा प्रवास करावा लागतो. सध्याची बिघडलेली आर्थिक परिस्थिती पाहता बहुतांश रुग्णांना खासगी वाहनाने प्रवास परवडत नाही. या खर्चामुळे अनेक रुग्ण उपचारापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे अशा रुग्णांचा मृत्यू दर करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंपेक्षा अधिक होत चालला आहे.” तसेच, गंभीर आजार असलेल्या रुग्णांना त्याच्या उपचारादरम्यान आधारासाठी सोबत नातेवाईकाची गरज असते. अशावेळी सर्वसामान्य रुग्णांना व त्याच्या नातेवाईकांना उपचारादरम्यान खासगी वाहनाने प्रवास परवडणं शक्य नसल्याने त्यांना रेल्वेने प्रवासासाठी मुभा देणे गरजेचे आहे असे देखील म्हटले आहे.

गंभीर वैद्यकीय उपचारांसाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना रेल्वे प्रवासासाठी परवानगी दिली जावी, या मनसेच्या आग्रही मागणीचा राज्य सरकार व रेल्वे प्रशासनाने मानवतेच्या दृष्टीने विचार करावा, अशी विनंती देखील पत्रात करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या या पत्राच्या प्रती मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना देखील पाठवण्यात आलेल्या आहेत. पत्रावर मनसे नेते अमित ठाकरे यांची स्वाक्षरी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2020 2:27 pm

Web Title: allow critically ill patients to travel by train demands amit thackeray to cm msr 87
Next Stories
1 तुम्हाला पाकड्यांनी मतदान केलं आहे का? संजय राऊतांचा कंगनाला समर्थन करणाऱ्या नेत्यांना सवाल
2 “मी अ‍ॅक्शनवाला माणूस आहे,” कंगनाच्या धमकीच्या आरोपांवर संजय राऊतांचं प्रत्युत्तर
3 कंगनाच्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप, म्हणाले…
Just Now!
X