करोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, अशी विनंती वारंवार सरकारी यंत्रणांकडून करण्यात येत आहे. मात्र ही विनंती धुडकावून नागरिकांनी मंगळवारी पाडव्याच्या निमित्ताने बाजारपेठांमध्ये गर्दी केली होती. ग्राहकांना खरेदी करता यावी यासाठी दुकानदारांनी दुकानाचे निम्मे दार बंद ठेवून वस्तूंची विक्री सुरू ठेवली होती. तर रस्त्यांवरील फे रीवाल्यांच्या ठेल्यांभोवती ग्राहकांचा गराडा पडला होता. अनेक ठिकामी मुखपट्टीचा वापर आणि अंतरनियम पायदळी तुडवत दुकानदार आणि ग्राहक खरेदी-विक्रीत मश्गूल होते. काही ठिकाणी तर पोलिसांदेखतच करोनाविषयक नियम पायदळी तुडविले जात होते.

दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य सरकारने अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंदी ठेवण्याचे निर्देश दिले होते. गेल्या दोन दिवसात काही दुकानदारांनी दुकानाची निम्मी दारे उघडी ठेवून वस्तूंची विक्री सुरू ठेवली होती.  मंगळवारी तर करोनाविषयक नियमांना पूर्णत: हरताळ फसण्यात आल्याचे ठिकठिकाणी दिसत होते. पाडव्याच्या दिवशी लोक खरेदीसाठी येणार याची खात्री बाळगूनच दुकानदारांनी तयारी केली होती.  दादर, हिंदमाता परिसरात दुकानातील काही कर्मचारी दार बंद करून दुकानाबाहेर उभे होते. ग्राहक येताच त्याला मागच्या दाराने किंवा थेट समोरून दुकानात पाठविण्यात येत होते.  बंद दाराआड सुरू असलेल्या या खरेदीत दुकानांमध्ये ग्राहकांची लक्षणीय संख्या होती. साड्यांच्या दुकानात विशेष गर्दी पाहायला मिळाली.

मुंबईतील अन्य भागांमध्येही हीच स्थिती होती. दादर, चेंबूर, धारावी, परळ येथील स्थानिक बाजारपेठांमध्ये ग्राहकांची वर्दळ होती. कपडे खरेदीकडे लोकांचा अधिक कल होता. त्यापाठोपाठ इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानांमध्ये गर्दी होती. दुकानाचा निम्मा दरवाजा बंद करून ठिकठिकाणी फ्रीज, टीव्ही, वातानुकूलित यंत्रणा यांची विक्री होत होती. यासोबतच घड्याळे, पूजेचे साहित्य, हार्डवेअर, रंगांची दुकाने, फर्निचर, भांडी, गृहोपयोगी वस्तू या दुकानदारांनीही दुकाने उघडून गर्दीचा फायदा करून घेतला. अशा दुकानांभोवती पोलीस फिरताना दिसत होते. मात्र नियमांना तिलांजली देणाऱ्यांविरुद्ध कारवाई होताना दिसत नव्हती.

दादर गर्दीचे आगार

पाडव्याच्या पूर्वसंध्येला दादर बाजारपेठेत जमू लागलेली गर्दी मंगळवारी संध्याकाळपर्यंत टिकून होती. पाडव्याच्या दिवशी सकाळी फुले, हार, पूजेचे साहित्य घेण्यासाठी दादर आणि आसपासच्या परिसरातील लोक फुलबाजारात जमले होते. दुपारनंतर मात्र बाहेरून येणाऱ्या ग्राहकवर्गाने बाजारपेठ गजबजली. दुकाने आणि दुकानाबाहेरचे ठेलेवाले दोन्हीकडे लोकांची झुंबड होती. विशेष म्हणजे फेरीवाले सर्व नियम धाब्यावर बसवून गर्दी जमवत असतानाही प्रशासनाचा कुठेही हस्तक्षेप होताना दिसला नाही.

धारावीत बेफिकिरी

दाट लोकवस्तीच्या धारावीमध्ये रुग्णवाढ झपाट्याने होत असतानाही प्रशासनाकडून निर्बंधांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. लेदर बाजार, कारखान्यांना जोडून असलेली दुकाने आणि नाक्यानाक्यांवर पसरलेल्या बाजारपेठा सर्रास खुल्या होत्या. दिवस-रात्र रस्त्यांवर लोकांची गर्दी पाहायला मिळते. करोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत असतानाही मुखपट्टी आणि अंतरनियमाबाबत लोकांमध्ये गांभीर्य नसल्याचे दिसत आहे.