घामाने वैतागलेल्या मुंबईकरांना संध्याकाळी समुद्रावरून येणारा वारा जसा दिलासा देत आहे, तसाच दिलासा महात्मा फुले मंडईत अवतरलेला एक पाहुणाही देत आहे. सुकलेल्या गवताच्या आढीमध्ये हिरव्या-पिवळ्या-केशरी छटांचा रंग लेवून बसलेला हा पाहुणा म्हणजे कोकणातल्या देवगडमधून आलेला हापूस आंबा! फळांचा राजा अशी ओळख असलेला हा हापूस सध्या ८०० ते १५०० रुपये डझन या दराने विकला जात आहे.
दरवर्षी अस्सल हापूस आंबा मुंबईमार्गे परदेशात जात असल्याने मुंबईकरांसाठी हे फळ दिवसेंदिवस महाग होत चालले आहे. मात्र यंदा कोकणातल्या आमराया चांगल्याच मोहरल्या होत्या. पण मध्यंतरी कोकणात पडलेल्या पावसामुळे हाताशी आलेले काही फळ गमवावे लागले. तरीही एकूण फळापैकी ८० टक्के फळ बाजारात येण्याची शक्यता असल्याचे आंबा व्यापारी भारत पवार यांनी सांगितले.
सध्या मुंबईत विकायला आलेल्या सामान्य आकाराच्या देवगड हापूसचा भाव डझनाला ८०० रुपये आहे. मात्र जास्त मोठा हापूस घ्यायचा झाल्यास डझनाला १००० ते १५०० रुपये एवढा भाव चालू आहे. सध्या आंब्याची आवक फार जास्त नाही. एकदा फळ जास्त प्रमाणात बाजारात आले की, डझनामागे दरही खाली येतील, असे आंबा व्यापारी राम मोर्डे यांनी सांगितले