सर्वोच्च न्यायालयाने जगन्नाथ पुरी रथयात्रेला दिलेल्या परवानगीच्या धर्तीवर वाखरी ते पंढरपूर या अखेरच्या टप्प्यात किमान शंभर वारकऱ्यांसह माउलींच्या पालखीस पायी दिंडीसाठी परवानगी द्या, या मागणीसाठी वारकरी सेवा संघाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मंगळवारी त्यांच्या याचिकेवर तातडीची सुनावणी होणार आहे.

पंढरपूरच्या वारीची परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू आहे. या सोहळ्यासाठी मानाच्या नऊ प्रमुख पालख्यांसह दोन हजारांच्या आसपास दिंडय़ा शेकडो मैलांचा प्रवास करून पंढरपुराकडे येत असतात. मात्र यंदा करोनाच्या संकटामुळे पहिल्यांदाच पंढरपूरची वारी रद्द करण्यात आली. २९ मे रोजी सरकारने हा निर्णय जाहीर केला.

सर्वोच्च न्यायालयाने जगन्नाथ पुरी रथ यात्रेला दिलेल्या अटीप्रमाणे वाखरी ते पंढरपूर या अंतिम ६ किमीच्या मार्गात १०० वारकऱ्यांच्या उपस्थितीत पायी दिंडी काढण्यास परवानगी देण्यात यावी. या दरम्यान स्वच्छता, आरोग्य आणि सामाजिक अंतर पाळणे अशा नियमांचे काटेकोर पालन केले जाईल, असा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे.