News Flash

‘नरेंद्र वर्मावरही कारवाई व्हावी’

राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते नरेंद्र वर्मा हे कपिल शर्मा प्रकरणामुळे पुन्हा अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.

तिवरांच्या कत्तलीचे प्रकरण प्रलंबित

अंधेरीतील लोखंडवाला परिसरात आपल्या शाळेला खेटून असलेल्या भूखंडावरील तिवरांची कत्तल करून पेवरब्लॉकच्या साह्य़ाने रस्ता तयार करून वाहनतळासाठी जागेचा वापर करणारे माजी नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते नरेंद्र वर्मा हे कपिल शर्मा प्रकरणामुळे पुन्हा अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. तिवरांची कत्तल करून अनधिकृतपणे जागेचा वापर केल्याबद्दल नरेंद्र वर्मा यांच्याविरोधात भाजपचे विवेकानंद गुप्ता यांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी एफआयआर दाखल केल्यानंतर पुढील कारवाई थंडावली. मात्र, आता वर्मावरील कारवाईलाही वेग द्या, अशी मागणी गुप्ता यांनी केली आहे.

अंधेरी येथील लोखंडवाला संकुल परिसरात वर्मा यांच्या जानकीदेवी पब्लिक स्कूललगत तिवरांचे जंगल पसरले आहे. तेथील म्हाडाच्या एका भूखंडावरील अतिक्रमण हटवून तो जानकीदेवी पब्लिक स्कूलसाठी भाडेतत्त्वावर मिळविण्यात आला आहे. हरित पट्टय़ात असलेल्या या भूखंडावरील तिवरांची कत्तल करून तेथे पेव्हरब्लॉकचा रस्ताच तयार करण्यात आल्याची तक्रार भाजपचे सरचिटणीस विवेकानंद गुप्ता यांनी केली होती.

त्याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर तहसीलदारांनी याविरोधात पोलिसात एफआयआर दाखल केला. मात्र त्यानंतर आजतागायत कोणतीच कारवाई पोलीस अथवा पालिकेने केलेली नाही.

कपिल शर्मा प्रकरणामुळे या प्रकरणाकडे लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी गुप्ता यांनी केली आहे.

  • आजघडीला पेव्हरब्लॉक बसविण्यात आलेल्या जागेवर शाळेच्या बसगाडय़ा आणि मुलांना शाळेत घेऊन येणाऱ्या धनदांडग्यांची वाहने उभी करण्यात येत आहेत, असे गुप्ता म्हणाले.
  •  याप्रकरणी नरेंद्र वर्मा यांच्यावर कारवाईची मागणी गुप्ता यांनी केली.

तिवरांपासून ५० मीटर अंतरावर कुठलेही बांधकाम करण्यास मनाई आहे. असे असतानाही तिवरांची कत्तल करून पेव्हरब्लॉकचा रस्ता तयार करण्यात आला असून पर्यावरण कायद्याचा भंग झाला आहे. म्हाडाने तात्काळ हा भूखंड ताब्यात घ्यायला हवा होता. तसेच पालिकेने पेव्हरब्लॉक काढून टाकायला हवे होते; परंतु म्हाडा आणि पालिकेकडून अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही.

 विवेकानंद गुप्ता, सरचिटणीस, भाजप

सध्या हे प्रकरण लोकायुक्तांकडे आहे. लोकायुक्तांनी सुनावणीदरम्यान म्हाडा, पालिका आणि वन विभागाकडे या संदर्भात अहवाल मागविला होता. पालिकेने आपला अहवाल लोकायुक्तांकडे सादर केला आहे. सुनावणीदरम्यान लोकायुक्तांकडून देण्यात येणाऱ्या आदेशांचे पालन केले जाईल.

 पराग मसुरकर, साहाय्यक आयुक्त, ‘के-पश्चिम’ विभाग कार्यालय

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2016 12:18 am

Web Title: also take action on narendra varma
Next Stories
1 बोरिवलीत गणेश विसर्जनादरम्यान पोलिसांवर दगडफेक
2 ‘विघ्नकर्त्यां’ मंडळांना नोटिसा
3 कपिल शर्माच्या विरोधात मनसेने दाखल केली तक्रार