महामार्गावरून अचानक गायब झालेल्या एका ट्रकने गूढ निर्माण केले. हा ट्रक वसईत सापडला, परंतु त्यामधील चालक आणि क्लीनर बेपत्ता होते. ट्रकमधील लाखो रुपयांचा माल पडून होता. चोरी झाली नव्हती. मग दोघे गेले कुठे? सुरुवातीला साधे वाटणारे हे प्रकरण धक्कादायक वळणावर गेले.

१५ ऑगस्ट २०१७ रोजी जालन्याहून अ‍ॅल्युमिनियम घेऊन तळोजाच्या दिशेने निघालेला एक ट्रक अचानक बेपत्ता झाला होता. त्या ट्रकचा चालक आणि क्लीनर दोघेही बेपत्ता झाले होते. नियोजित वेळेत ट्रक न आल्याने मालकाने शोधाशोध केली आणि मग पोलिसात तक्रार दिली. ट्रकमध्ये ५ टन अ‍ॅल्युमिनियम होते. त्याची किंमत २० लाख रुपये होती. सुरुवातीला वाटलं होतं की ट्रकचालकानेच ट्रकमधील लाखो रुपयांचा माल परस्पर विकून पोबारा केला असावा. परंतु काही दिवसांनी ट्रक आहे, त्याच स्थितीत वसईच्या निर्जन भागात आढळला. ट्रकमधील लाखो रुपयांचा माल तसाच होता, परंतु दोघे गायब होते. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढत चालले होते.

महेंद्रप्रताप सिंग (४२) हा ट्रकचालक गेल्या २० वर्षांंपासून मुंबईत ट्रकचालक म्हणून काम करत होता. मूळच्या उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्य़ात तो राहत होता. तसे त्याचे कुटुंब मूळचे शेतकरी होते. मुंबईत काम करून तो भावाच्या शिक्षणाचा खर्च करत होता. अधूनमधून तो गावी ये-जा करत होता, त्याचा भाऊ अभियंता झाला. भावाचे शिक्षण झाल्यानंतर कुटुंबीयांनी आता घरी परत ये म्हणून तगादा लावला. त्याने मालकाला सांगितले की आता मी मुंबई सोडतोय. भाऊ  अभियंता झाला आहे, त्यामुळे यापुढे मी हे काम सोडून गावी जाऊन शेती करणार आहे. त्याचा मालकही अशा प्रामाणिक चालकाच्या नोकरी सोडण्याच्या निर्णयाने नाखूश होता. पण एक शेवटची फेरी म्हणून मालकाने महेंद्रसिंगला एक काम सोपवलं. जालन्याहून अ‍ॅल्युमिनिअमचे कंटेनर मुंबईला आणायचे होते. सुमारे वीस लाख रुपयांचा माल होता. काम जबाबदारीचे होते. वासिम नावाचा क्लीनर सोबत होता. महेंद्रसिंगची ती शेवटची फेरी होती. परंतु शेवटच्या फेरीला गेलेला महेंद्रसिंग आणि क्लीनर वासिम गायब झाले होते.

ट्रकचालक आणि क्लीनर बेपत्ता असताना त्यांचा ट्रक वसईत सापडल्याने वसईच्या वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. पण तपास थंडावला होता. महेंद्रसिंगच्या शोधासाठी त्याचा अभियंता भाऊ  ए.के.सिंग मुंबईला आला. महेंद्रसिंग प्रामाणिक होता. इतक्या वर्षांत त्याने कसलाच अपहार किंवा गैरव्यवहार केलेला नव्हता. मग असं काय घडलं की भरला ट्रक वसईत टाकून ते दोघे गायब झाले असावे. वसईचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोशन राजतिलक यांनी या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडे सोपविला. साहाय्यक पोलीस निरीक्षक हितेंद्र (नितीन) विचारे यांनी सूत्रे घेतली. त्यांच्या पथकातील मंगेश चव्हाण, रजनिकांत मोरे, प्रशांत पाटील आदींनी तपास कुठल्या दिशेने करायचा त्याची आखणी केली.

महेंद्रसिंग याचा मोबाइल नाशिकच्या आसपास बंद होता, तर क्लीनर वासिमचा मोबाइल शहाडच्या परिसरात बंद येत होता. जे काही घडलं असेल तर ते महामार्गावरच असा निष्कर्ष पोलिसांनी काढला आणि तपास सुरू केला. पोलिसांच्या पथकाने नाशिक परिसरातील सर्व धाबे तपासले. एका ठिकाणी धाब्यावाल्याने त्यांना ओळखले. याच धाब्यावर महेंद्रसिंग आणि क्लीनर वासिम यांच्यात वाद झाला होता. धाब्यावर काम करणाऱ्या महिलेची वासिमने छेड काढली होती. त्याला महेंद्रने आक्षेप घेतला होता. त्यावरून त्यांच्यात भांडण झाले होते. पोलीस तपासाचे धागेदोरे जुळत होते. मग दोघे कसे बेपत्ता, हा प्रश्न कायम होता.

पोलिसांनी महेंद्रच्या मोबाइलच्या कॉल्सची तपासणी केली. त्यात काही संशयास्पद आढळलं नाही. परंतु वासिम सकाळपासून चार व्यक्तींच्या संपर्कात होता. हे चार जण पोलिसांच्या रडारवर आले. त्यांचा पत्ता लागला तर या दोघांच्या बेपत्ता होण्यामागचं गूढ उलगडू शकणार होतं. मात्र त्यांचा काहीच ठावठिकाणा पोलिसांना लागत नव्हता. दरम्यान अचानक बंद असलेल्या महेंद्रच्या मोबाइलवरून एका व्यक्तील फोन गेला होता. पोलिसांना लगेच त्याची सूचना मिळाली आणि त्यांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं. तो एक व्यापारी होता. त्याला क्लीनर वासिमने फोन केला होता. म्हणजे वासीम जिवंत होता. पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवली. त्वरित वासिमचा शोध सुरू केला मात्र तो काही हाती लागत नव्हता.

दरम्यान भिवंडी येथील एका नाल्यात महेंद्रप्रताप सिंगचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. आता या प्रकरणाने गंभीर वळण घेतलं होतं. पोलिसांनी वासिमच्या मोबाइलमधून संपर्क झालेल्या चार जणांपैकी सलाउद्दीन नावाच्या आरोपीला अटक केली. त्याने या प्रकरणातील खळबळजनक गुन्ह्याची कबुली दिली,

क्लीनर वासिमच्या मदतीने सलाउद्दीन आणि त्याच्या साथीदारांनी महेद्रची हत्या केली होती. ज्या ट्रकमध्ये अ‍ॅल्युमिनियमचा माल होता, तो विकायचा होता. महेंद्रसिंग कायमचा गावी जाणार होता. त्यामुळे हा सगळा चोरीचा बनाव त्याच्या अंगावर टाकायची योजना होती. ठरलेल्या योजनेनुसार आरोपी वासिम आणि महेंद्रप्रताप नाशकातल्या सरदार धाब्यातून निघाले. तेथे त्याने लिफ्ट देण्याच्या बहाण्याने सलाउद्दीन आणि शंकर या आपल्या दोन साथीदारांना घेतले. त्यांनी गाडीतच महेंद्रप्रतापची हत्या केली आणि त्याचा मृतदेह भिवंडी येथील नाल्यात टाकून दिला. ट्रक त्यांनी वसईला ठेवला.

वसईतील एका व्यापाऱ्याला ट्रकमधील माल विकायचा होता. पण त्यांचा सौदा फिस्कटला. आता पुढे काय करायचं हा प्रश्न होता. त्यामुळे त्यांनी ट्रक तिथेच टाकून पळ काढला. विशेष तपास पथकाकडे या प्रकरणाचा तपास आल्यानंतर साहाय्यक पोलीस निरीक्षक हितेंद्र विचारे यांच्या पथकाने अवघ्या पाच दिवसात या प्रकरणाचे गूढ उकलले. पोलिसांनी या प्रकरणात क्लीनर वासिम, सलाउद्दीन आणि शंकर यांना अटक केली आहे. मुंबईत कामाची शेवटची फेरी करणाऱ्या महेंद्रप्रतापच्या आयुष्यातली ती शेवटची फेरी ठरली.

@suhas_news