News Flash

५६ इंच पोलादी छाती असूनही रक्तपात का थांबला नाही?; उद्धव ठाकरेंचा मोदींना सवाल

अमानुष हल्ले थांबवण्याची हिंमत कोणात आहे?

अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर टीकेचा बाण सोडला आहे. काश्मीर खोऱ्यात दहशतवाद आणि हिंसाचाराचे थैमान घालणारे अतिरेक्यांचे राज्य आहे. ते संपवण्यासाठी आज ५६ इंच पोलादी छातीचे राज्य हवे. मोदी यांच्या रुपाने ते लोकांनी आणले असले तरी, काश्मिरातील जवानांचे हौतात्म्य आणि निरपराध्यांचा रक्तपात थांबलेला नाही, असं उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’च्या अग्रलेखातून म्हटलं आहे. मोदीजी, अतिरेक्यांना आवरा हो, असं आवाहनही त्यांनी केले.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

>> हिंदुस्थानी राज्यकर्त्यांच्या धमक्यांना आणि डरकाळ्यांना आपण जुमानत नसल्याची बांग ठोकून अमरनाथ यात्रेकरूंचे हत्याकांड घडले आहे. हे सर्व काँग्रेस राजवटीत घडत होते म्हणून हिंमतवाल्यांचे राज्य देशातील जनतेने आणले आहे, पण राज्य बदलल्याचे चित्र कश्मीर खोऱ्यात तर अजिबात दिसत नाही.

>> आज देशाला खरे तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येत आहे. शिवसेनाप्रमुखांच्या गर्जनेनंतर अतिरेक्यांनी शेपूट घातले ते घातलेच व अमरनाथ यात्रा पुढची २०–२१ वर्षे सुरळीत पार पडली. आज पुन्हा अतिरेकी मोकाट सुटले आहेत. मोदीजी, त्यांना आवरा हो!

>> पंतप्रधान नुकतेच चार-पाच देशांच्या दौऱ्यावर जाऊन आले. परकीय भूमीवर जाऊन त्यांनी हिंदुस्थानच्या भूमीवरील दहशतवादावर चिंता व्यक्त केली. मित्रराष्ट्रांच्या (?) मदतीने दहशतवादाशी लढण्याचा मनोदय त्यांनी जाहीर केला. मात्र त्याच वेळी इकडे कश्मीरात नऊ निरपराध्यांच्या हत्येने देश हादरला आहे.

>> हिंदुस्थानी राज्यकर्त्यांच्या धमक्यांना आणि डरकाळ्यांना आपण जुमानत नसल्याची बांग ठोकून अमरनाथ यात्रेकरूंचे हत्याकांड घडले आहे. केंद्रात मोदींचे मजबूत व जम्मू-कश्मीरात पीडीपी-भाजपचे पोलादी राज्य असताना रक्तपाताचा महापूर यावा याची चिंता आम्हाला आहे.

>> कश्मीर खोऱ्यात आज कोणाचेही राज्य नसून तिथे दहशतवाद व हिंसाचाराचे थैमान घालणारे अतिरेक्यांचे सरकार सुरू आहे. हे अतिरेक्यांचे सरकार खतम करण्यासाठी आज ५६ इंच पोलादी छातीचे राज्य हवे. मोदी यांच्या रूपाने ते लोकांनी आणले असले तरी कश्मीरातील जवानांचे हौतात्म्य व निरपराध्यांचा रक्तपात का थांबलेला नाही, याचे उत्तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प व इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिनसाहेब देऊ शकणार नाहीत. हे उत्तर आपल्यालाच द्यावे लागेल. अर्थात केंद्र सरकारने अमरनाथ यात्रेवरील हल्ल्यावरून तशी ‘चोख’ उत्तरे लगेच ‘ट्विटर’वरून दिली आहेत.

>> हिंदुस्थान घाबरणार नाही, झुकणार नाही असे सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. पंतप्रधानांनीदेखील या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. मात्र हे अमानुष हल्ले थांबविण्याची हिंमत आज कोणात आहे?

>> कश्मिरातील अमानुष हत्याकांडानंतर सरकारने एक केले ते म्हणजे नेहमीप्रमाणे ‘हाय अलर्ट’चा इशारा देऊन दिल्लीची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. ही व्हीआयपींच्या सुरक्षेची सोय झाली, पण फक्त दुःख व्यक्त करून, कागदी निषेध करून आपण अतिरेक्यांशी कसे लढणार?

>> जवानांवर हल्ला करणाऱ्यांना सरकारी मदत मिळते व लष्करी हल्ल्यात मारल्या गेलेल्या बुरहान वाणीच्या कुटुंबास सरकारी तिजोरीतून घसघशीत नुकसानभरपाई देण्याचे पापही केले जाते. जेव्हा असे प्रकार सरकारी कृपाशीर्वादानेच घडतात तेव्हा त्या राजवटीत लष्करी जवानांचा स्वाभिमान व शौर्य पायदळी तुडविण्याची हिंमत वाढते.

>> हिंमतवाल्यांचे राज्य देशातील जनतेने आणले आहे, पण राज्य बदलल्याचे चित्र कश्मीर खोऱ्यात तर अजिबात दिसत नाही. कश्मीरातील ‘पाक झिंदाबाद’च्या घोषणा थांबलेल्या नाहीत व लष्करी जवान हे ‘हिंदुस्थानचे कुत्रे’ आहेत अशी देशद्रोही भावना त्या ठिकाणी वाढीस लागली आहे. मग तिथे बदलले काय?

>> अतिरेकी व पाकडय़ांना कडक संदेश द्यायचा असेल तर पुढच्या आठ दिवसांत ३७० कलम हटवून कश्मीर हिंदुस्थानचाच अविभाज्य भाग असल्याचे जगाला दाखवून द्या. वीरश्रीयुक्त भाषणे व धमक्यांनी जनतेचे कान विटले आहेत. देशाला ‘अॅक्शन’ हवी आहे व त्यासाठी पंतप्रधानांच्या अंगात हिटलरचा संचार झाला तरी चालेल.

>> आज देशाला खरे तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येत आहे. अमरनाथ यात्रा उधळून लावण्याची बांग कश्मीरातील अतिरेक्यांनी ठोकताच मुंबईतून शिवसेनाप्रमुख उसळून म्हणाले होते, ‘‘याद राखा! माझ्या एका जरी हिंदू अमरनाथ यात्रेकरूच्या केसाला धक्का लागला तर देशातून ‘हज’चे एकही विमान उडू देणार नाही. गाठ माझ्याशी आहे!’’ याला म्हणतात गर्जना!

>> शिवसेनाप्रमुखांच्या गर्जनेनंतर अतिरेक्यांनी शेपूट घातले ते घातलेच व अमरनाथ यात्रा पुढची २०-२१ वर्षे सुरळीत पार पडली. आज पुन्हा अतिरेकी मोकाट सुटले आहेत. मोदीजी, त्यांना आवरा हो!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2017 8:43 am

Web Title: amarnath yatra terror attack shiv sena uddhav thackeray took a dig on pm narendra modi bjp government
Next Stories
1 प्रवेशाचा कट-ऑफ खाली!
2 विकास आराखडय़ावरील चर्चेतून नगरसेवक बाद
3 आरेतील फुलपाखरू उद्यानाला बहर
Just Now!
X