मैदानावर खेळत असतानाच ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मुंबईत एका नवोदित क्रिकेटपटूचा मंगळवारी मृत्यू झाला. रत्नाकर मोरे (वय २९) असे या क्रिकेटपटूचे नाव आहे. मुंबईतील ओव्हल मैदानावर हा दुर्दैवी प्रकार घडला.
टाटा उद्योगसमुहातील आंतरविभागीय सामन्यांसाठी रत्नाकर ओव्हल मैदानावर आला होता. ट्रॉम्बे विभागाचे प्रतिनिधीत्व तो करीत होता. यष्टीरक्षक असलेल्या रत्नाकरला खेळ सुरू झाल्यावर अस्वस्थ वाटू लागले होते. त्यानंतर सामना सुरू असतानाच त्याला ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने तो मैदानात कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापू्र्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू फिल ह्यूजचा मैदानातच चेंडू लागून मृत्यू झाला होता. सर्व क्रिकेटप्रेमींना मनाल चटका लावून गेलेल्या या घटनेला आठवडाही होत नाही, तोच पु्न्हा एकदा एका नवोदित क्रिकेटपटूचा मैदानातच मृत्यू झाल्यामुळे अनेक क्रिकेटप्रेमींनी दुःख व्यक्त केले.