News Flash

अंबानी स्फोटकं प्रकरण : सीसीटीव्ही, डीव्हीआर सचिन वाझेंच्या सहकाऱ्यांनी नेले

"वाझे यांना बेकायदा ताब्यात घेऊन अटक"

सचिन वाझे (संग्रहित छायाचित्र। इंडियन एक्स्प्रेस)

अंबानी यांच्या घराजवळ आढळून आलेल्या स्फोटकं प्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक झाली असून, एनआयएकडून पुढील तपास सुरू आहे. पुरावे गोळा करण्याचं काम केलं जात आहे. एनआयएकडून वाझे यांच्या घराच्या परिसरासह इतर ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजचा शोध घेतला जात आहे. मात्र, सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर (Digital Video Recorder) गायब झाल्याचं समोर आलं. हे फुटेज आणि डीव्हीआर वाझे यांच्या टीममधील अधिकाऱ्यांनी नेल्याचं समोर आलं आहे.

अंबानी स्फोटकं प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला. याप्रकरणात एनआयएने सचिन वाझे यांना शनिवारी अटक केली. वाझे यांच्या अटकेनंतर गुन्हेगारी गुप्तवार्ता युनिटकडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. वाझे यांना अटक केल्यानंतर एनआयए वाझे यांच्या घराजवळील आणि इतर ठिकाणच्या सीसीटीव्ही व डीव्हीआरच्या शोधात होती. मात्र, सीसीटीव्ही आणि डीव्हीआर वाझे यांच्या टीममधील सहकाऱ्यांनी नेल्याचं एनआयएच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.

आणखी वाचा- पीपीई किट घातलेली ती व्यक्ती वाझे की आणखी कुणी?; एनआयएकडून तपास सुरू

अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकं सापडल्याच्या दोन दिवसानंतर गुन्हेगारी गुप्तवार्ता टीमने वाझे राहत असलेल्या मुंबई-आग्रा रोडवरील साकेत को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसाटीला भेट दिली होती. यावेळी टीम सीसीटीव्ही आणि डीव्हीआर घेऊन होती, अशी माहिती समोर आली आहे. जी इनोव्हा गाडी स्कॉर्पिओसोबत आढळून आली होती, तिचे शेवटचं लोकेशन ठाण्यातील माजीवाडा जंक्शन येथे आढळून आलं होतं. हे ठिकाण वाझे यांच्या घरापासून ३ किमी अंतरावर आहे.

आणखी वाचा- घटनाक्रम! स्कॉर्पिओ, मनसुख हिरेन मृतदेह ते सचिन वाझेंना अटक; कोणत्या दिवशी काय घडलं?

मनसुख यांचे ठाण्यातील निवासस्थान, दुकान आणि भोवतीच्या आस्थापनांमधील सीसीटीव्ही व ‘डीव्हीआर’चा(सीसीटीव्ही चित्रण साठवून ठेवणारे यंत्र) शोध एनआयए घेत आहे. तपासाचं कारण देत गुन्हे शाखेचे पथक हे यंत्र घेऊन गेल्याची माहिती एनआयएला मिळाली. असाच प्रकार वाहनांच्या नोंदणी क्रमांक तयार करणाऱ्या अन्य दुकानातही घडल्याची माहिती उघडकीस आली आहे. येथील दुकानदारांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार वाझे यांनी डीव्हीआरबरोबर नोंद वही तपासासाठी सोबत नेली. वाझे राहात असलेल्या ठाण्यातील इमारतीतील डीव्हीआरही पोलीस घेऊन गेले, अशी माहिती स्थानिकांनी एनआयए अधिकाऱ्यांना दिली. एनआयएच्या पथकाने सोमवारी इमारतीच्या सुरक्षारक्षकासह काही रहिवाशांकडे चौकशी केली. त्यानंतर हे सर्व समोर आलं.

वाझे यांना बेकायदा ताब्यात घेऊन अटक; भावाची उच्च न्यायालयात याचिका

सचिन वाझे यांचे भाऊ सुधर्म यांनी सोमवारी उच्च न्यायालयात ‘हेबियस कॉर्पस’ याचिका दाखल केली. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) वाझे यांना बेकायदा ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्यामुळे त्यांना उच्च न्यायालयात हजर करण्याचा आदेश एनआयएला द्यावेत आणि ही अटक ही कायद्यानुसार होती हे स्पष्ट करण्यास सांगावे, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांना हाताशी धरून काही प्रभावी राजकीय नेत्यांनी वाझे यांना लक्ष्य केले आहे. ते वाझे यांना बळीचा बकरा बनवत आहेत, असा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2021 9:03 am

Web Title: ambani bomb scare case waze team took cctv feed from his housing society bmh 90
Next Stories
1 महाविद्यालयांतील प्रवेशांत घट
2 ५० रुग्णांचे नमुने ‘जिनोम सिक्वेन्सिंग’साठी
3 पूर्व उपनगरांत १७ कोटींची नालेसफाई
Just Now!
X