News Flash

सचिन वाझे आणि मनसुख हिरेन १७ फेब्रुवारीला १० मिनिटांसाठी भेटले होते; सीसीटीव्हीत कैद

हिरेन ओला कॅबने दक्षिण मुंबईत गेले होते

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घऱाबाहेर स्फोटकांनी भरलेलं वाहन सापडलेल्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या ताब्यात असणारी अजून दोन लक्झरी वाहनं जप्त केली आहेत. यामधील एक कार (Pardo) रत्नागिरीमधील शिवसेना नेता विजयकुमार भोसले यांच्या नावावर रजिस्टर आहे. तर दुसरं वाहन मर्सिडीज बेन्झ आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

तीन दिवसांपूर्वी वाझेंकडून वापरण्यात येत असलेली मर्सिडीज पोलिसांकडून जप्त करण्यात आली. ठाण्यातील उद्योजक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या एटीएसकडे सध्या अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओचा ताबा आहे. शुक्रवारी ठाणे सत्र न्यायालयात एटीएसकडून वाझेंची कोठडी मागितली जाऊ शकते.

यादरम्यान एनआयए आणि एटीएसने सीसीटीव्हींची तपासणी केली असता १७ फेब्रुवारीला हिरेन आणि वाझे यांच्यात फोर्टमध्ये जीपीओजवळ मर्सिडीज कारच्या आत १० मिनिटं चर्चा झाल्याचं समोर आलं आहे. हिरेन ओला कॅबने दक्षिण मुंबईत गेले होते. आपली स्कॉर्पिओ मुलूंड -ऐरोली रोडला बंद पडल्याचा दावा त्यांनी केला होता.

सीसीटीव्हीमध्ये सचिन वाझे आपलं कार्यालय असणाऱ्या मुंबई पोलीस मुख्यालयातून मर्सिडीजमधून बाहेर पडताना दिसत आहेत. यानंतर त्यांचं वाहन सीएसएमटीबाहेर सिग्लजवळ उभं असल्याचं दिसलं आहे. सिग्नल सुरु झाल्यानंतर मर्सिडीज त्याच जागी उभी असते आणि वाझेंनी पार्किग लाईट सुरु करुन ठेवलेली असल्याचं सीसीटीव्हीत दिसत आहे.

काही मिनिटांनी मनसुख हिरेन रस्ता ओलांडून येतात आणि मर्सिडीजमध्ये बसतात. यानंतर मर्सिडीज जीपीओच्या समोर उभी असल्याचं दिसत आहे. जवळपास १० मिनिटं तिथे गाडी पार्क होती. यानंतर हिरेन गाडीतून बाहेर पडतात आणि गाडी पुन्हा पोलीस मुख्यालयात प्रवेश करताना दिसत आहे.

मनसुख हिरेन यांनी सीएसएमटीला ज्या ओला कॅबने प्रवास केला त्याच्या चालकाने एटीएसला दिलेल्या माहितीनुसार, प्रवासादरम्यान हिरेन यांना पाच वेळा फोन आला. वाझे यांनी हा फोन केल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, हिरेन यांना पोलीस मुख्यालयासमोर रुपम शोरुमजवळ भेटण्यास सांगण्यात आलं होतं. पण नंतर शेवटच्या फोनला जागा बदलून सीएसएमटी करण्यात आली अशी सूत्रांची माहिती आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2021 9:56 am

Web Title: ambani bomb scare sachin waze met mansukh hiren for 10 minutes on 17 february sgy 87
Next Stories
1 सचिन वाझेंकडून पुरावे नष्ट?
2 अभियांत्रिकी प्रवेशासाठी ‘सुलभीकरण’चा निर्णय अयोग्य
3 अखेर भूमिपूजन लांबणीवर
Just Now!
X