अंबानी स्फोटकं प्रकरणाचा तपास करणारे मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात ‘एनआयए’ने शनिवारी रात्री अटक केली. शनिवारी जवळपास १३ तास चौकशी करण्यात आल्यानंतर वाझे यांना ताब्यात घेण्यात आलं. स्फोटकं भरलेली स्कॉर्पिओ गाडी अंबानींच्या घराजवळ पार्क करण्यात वाझे यांचा सहभाग असल्याचा आरोप एनआयएने केलेला आहे. एनआयएचा या प्रकरणातील हस्तक्षेप आणि आणि वाझे यांना झालेल्या अटकेवरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली.

सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर शिवसेना नेते राऊत यांनी ‘एएनआय’शी संवाद साधला. राऊत म्हणाले, “सचिन वाझे हे अत्यंत प्रामाणिक आणि कार्यक्षम अधिकार आहे, यावर माझा विश्वास आहे. अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या जिलेटीन कांड्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर एका संशयास्पद मृत्यू प्रकरणातही. या प्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी मुंबई पोलिसांची आहे. त्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणांची गरज नाही. आम्ही एनआयएचा आदर करतो. पण, आपल्या पोलिसांनी सुद्धा याचा तपास केला असता. मुंबई पोलीस आणि एटीएस यांचाही आदर केला जातो, पण केंद्रीय तपास यंत्रणा वारंवार हस्तक्षेप करून मुंबई आणि मुंबई पोलिसांचं खच्चीकरण करत आहे. यंत्रणा राज्यात अस्थिरता निर्माण करत असून, मुंबई पोलीस आणि प्रशासनावर दबाब निर्माण करत आहे,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.

प्रतिमा, डाग आणि आर्दश; वाझेंना अटक झाल्यानंतर केलं होतं ट्विट

वाझे यांना अटक झाल्याचं वृत्त समोर आल्यानंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केलं होतं. “लोक तुमची प्रतिमा उद्ध्वस्त करू शकतात. तुमच्या व्यक्तिमत्वाला डाग लावू शकतात. पण तुम्ही केलेलं चांगल काम ते हिरावून घेऊ शकत नाही. तुमचं वर्णन त्यांनी कसंही केलं, तरी तुम्हाला ओळखणारे तुमचा आदर्श कायम ठेवतील,” असं राऊत यांनी म्हटलं होतं.