उद्योगपती मुकेश अंबानी धमकी आणि व्यावसायिक मनसुख हिरेन हत्येचा तपास करणारे राष्ट्रीय तपास यंत्रणेचे पथक गेल्या दोन दिवसांपासून एका महिलेकडे चौकशी करीत आहे. महिलेची ओळख, तिचा गुन्ह््यातील सहभाग आणि तिने चौकशीत उघड केलेली माहिती याबाबत एनआयएकडून गुप्तता पाळली जात आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे यांच्यासाठी दक्षिण मुंबईतील काही पंचतारांकित हॉटेलमध्ये कायमस्वरूपी खोली आरक्षित करण्यात आली होती, अशी माहिती एनआयएला मिळाली होती. त्यापैकी एका हॉटेलमध्ये केलेल्या चौकशीत या माहितीस दुजोरा मिळाला. हॉटेलच्या प्रवेशद्वारावरील, आवारातील सीसीटीव्ही चित्रणात वाझे ये-जा करताना दिसत आहेत. यापैकी एका चित्रणात एक महिला वाझेंसोबत आढळली. एनआयएकडून चौकशी सुरू असलेली महिला हिच असावी, असा अंदाज आहे. महिलेला ताब्यात घेण्यात आलेले नाही, असा दावा गुरुवारी रात्री एनआयएचे महानिरीक्षक अनील शुक्ला यांनी केला होता.

दरम्यान, गुरुवारी एनआयएने मिरा रोड येथील कनकिया भागातील एका घरात शोधाशोध के ली. मालकाने ही खोली भाड्याने दिली होती. मात्र भाडेकरू गेल्या दोन आठवड्यांपासून बेपत्ता असल्याची माहिती पुढे आली. त्यासोबत एनआयएच्या अन्य एका पथकाने गिरगाव चौपाटी जवळील एका सोशल क्लबवर छापा घातला. शुक्रवारी क्लब चालकाला चौकशीसाठी बोलावण्यात आले.

क्लबचालक संध्याकाळी पाचच्या सुमारास एनआयए कार्यालयात चौकशीसाठी हजर झाला. गुन्ह््यात वापर झालेल्या सीम कार्डचे धागेदोरे या क्लबमध्ये सापडल्याचा दावा एनआयएतर्फे करण्यात आला.