दादर येथील इंदू मिलच्या जमिनीवर अखेर रविवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन पार पडले. या स्मारकासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या भीमसैनिकांनी हा आनंदाचा क्षण पाहण्यासाठी चैत्यभूमीवर अलोट गर्दी केली होती. भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर, पोलीस बंदोबस्त धुडकावत हजारो भीमसैनिकांनी इंदू मिलमध्ये प्रवेश केला व जय भीमच्या घोषणांनी चैत्यभूमीचा परिसर दणाणून सोडला.

आंबेडकरी जनतेच्या अस्मितेचा आणि प्रस्थापित पक्षांच्या राजकीय खेळीचा केंद्रबिंदू ठरलेल्या आंबेडकर स्मारकाच्या भूमिपूजनाचा औपचारिक कार्यक्रम पार पाडून, भाजपने त्यांचे कट्टर विरोधक काँग्रेसबरोबरच मित्रपक्ष शिवसेनेवरही कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला.
या स्मारकाच्या भूमिपूजनासाठी भाजपने सर्वच आंबेडकरी नेत्यांना निमंत्रण दिले होते. त्यानुसार विविध गटांचे नेते एकत्र आले. पंतप्रधानांनी सायंकाळी चारच्या दरम्यान चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले. त्या वेळी त्यांच्यासमवेत राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार रामदास आठवले उपस्थित होते.
त्यानंतर इंदू मिलमध्ये स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. त्या वेळी भारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड्. प्रकाश आंबेडकर, रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले, रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे, डॉ. राजेंद्र गवई, सुलेखा कुंभारे आदी विविध गटांचे नेते उपस्थित होते.
इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांचे आंतरराष्ट्रीय स्मारक व्हावे, यासाठी आंबेडकरी समाजाने सातत्याने आंदोलने केली. त्या आंदोलनाचे यश म्हणजे रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते स्मारकाचे भूमिपूजन झाले. तो क्षण पाहण्यासाठी मुंबई व मुंबईच्या बाहेरूनही मोठय़ा संख्येने आंबेडकरी जनता चैत्यभूमी व इंदू मिलच्या परिसरात जमली होती.
चैत्यभूमी व इंदू मिलपासून काही अंतरावरच सामान्य जनतेला अडविले जात होते. त्यामुळे काही ठिकाणी कार्यकर्त्यांचे पोलिसांबरोबर खटके उडाले. सायंकाळी चार वाजेपर्यंत इंदू मिलच्या परिसरात हजारो भीमसैनिक जमा झाले. परंतु पोलिसांनी त्यांना बाहेरच रोखून ठेवले होते. भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला, पंतप्रधानांचे सभेच्या ठिकाणी प्रयाण झाल्यानंतर मात्र पोलीस बंदोबस्ताची पर्वा न करता भीमसैनिकांनी इंदू मिलमध्ये प्रवेश केला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, अशा घोषणांनी चैत्यभूमीचा परिसर दणाणून गेला होता.

बिहार निवडणुकांकडे लक्ष?
पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाचा भर प्रामुख्याने लोकनेते जयप्रकाश नारायण यांच्या कार्यापासून डॉ. आंबेडकरांचे जीवनकार्य, विचार आणि भाजपच्या केंद्र व राज्यांमधील राजवटीत त्याबाबत घेतलेल्या निर्णयांवर होता. शोषित, दलित व सर्व समाजघटकांना भाजपनेच सामावून घेतले आहे व साथ दिल्याचा उल्लेख त्यांनी केला. मागासवर्गीय समाजाचे आरक्षण कधीही रद्द होणार नाही, असे स्पष्ट करतानाच मोदी यांच्या भाषणाचा रोख हा बिहार निवडणुकीकडे होता, असे जाणवले.

गडकरी, फडणवीस यांचे कौतुक
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे बरेच कौतुक केले. केंद्राकडे मदतीसाठी न येता मूलभूत स्वरूपाचे जलयुक्त शिवार योजनेचे फडणवीस यांचे काम देशाला दिशा देणारे असल्याची प्रशंसा केली. स्मारकासह अनेक बाबींमध्ये फडणवीस यांनी गतिमानतेने पावले टाकली आणि नवनवीन संकल्पना लढविणारे कार्यमग्न मुख्यमंत्री, असे त्यांचे कौतुकही केले. गडकरी हेही कार्यशील मंत्री असल्याचे सांगून त्यांचे कामही धडाक्याने सुरू असते, असे सांगितले.

स्मारकासाठी केंद्राची मदत नाही
डॉ. आंबेडकरांच्या विचारांशी बांधीलकी सांगणाऱ्या आणि श्रेय घेणाऱ्या भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाने जवळपास बाजारभावाने इंदू मिलच्या जागेची किंमत वसूल केली आहे. विकास हस्तांतरण हक्काच्या (टीडीआर) स्वरूपात सुमारे ३२०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम राज्य सरकारला द्यावी लागणार आहे. डॉ. आंबेडकर हे राष्ट्रपुरुष असताना घासाघीस करून प्रचंड किंमत न घेता मोफतच ही जमीन देण्याची मागणी शिवसेनेसह सर्वपक्षीय नेत्यांनी करूनही मोदी यांनी त्याबद्दल चकार शब्दही काढला नाही.

दुष्काळाबाबत मदतीचा उल्लेख नाही
पंतप्रधान मोदी यांनी बिहारमध्ये निवडणुका असल्याने विकासाचे आर्थिक पॅकेज दिले. महाराष्ट्रात सलग दुष्काळ पडत असताना भरीव अर्थसाहाय्य द्यावे, अशी मागणी होत होती. पण मोदी यांनी त्याबाबत मौनच पाळणे पसंत केले.

खटले मागे घेणार
इंदू मिलची जागा स्मारकासाठी द्यावी, यासाठी आतापर्यंत आंदोलन केलेल्या कार्यकर्त्यांवरील फौजदारी खटले मागे घेण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.