जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या अधिकारात निर्णय घेण्याची मुभा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती, रामनवमी, ईद मिलादुनब्बी, महावीर, गुरुनानक, अण्णाभाऊ साठे जयंती व ख्रिसमसच्या दिवशी दारुबंदी (ड्राय डे) करण्याची सरकारची तयारी आहे, असे आश्वासन महसूल व उत्पादन शुल्क मंत्री एकनाथ खडसे यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिले. जिल्हाधिकारी आपल्या अधिकारात तसा निर्णय घेऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
विधान परिषदेत शरद रणपिसे, संजय दत्त, मुझफ्फर हुसेन, भाई जगताप, प्रकाश गजभिये यांनी राज्यात दारुबंदी करण्यासंदर्भात लक्षवेधू सूचना मांडली होती. विद्या चव्हाण यांनी राज्यात संपूर्ण दारुबंदी करावी अशी मागणी केली, तर दारुबंदीसाठी कार्य करणाऱ्या महिलांना सरकारने प्रोत्साहन द्यावे, अशी सूचना शोभाताई फडणवीस यांनी केली. प्रा. जोगेंद्र कवाडे व इतर सदस्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बुद्ध व इतर महापुरुषांच्या जयंतीदिनी तसेच अन्य सणांच्या दिवशी दारुबंदी करावी, अशी मागणी केली.
लोकांची मागणी असल्यास एखाद्या सणाला कोरडा दिवस जाहीर करण्याची म्हणजे त्या दिवसापूरती दारुबंदी करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती उत्पादन शुल्क राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली. एकनाथ खडसे म्हणाले की, अधिकृत दारु बंदी केली तर हातभट्टया वाढतील, त्यातून दुर्घटना घडतील. यापूर्वी कधीही दारु बंदीचा विचार केला नाही, उलट १९७२ पासून दारु विक्रीला सरकारने प्रोत्साहनच दिले आहे. राज्यात २६ जानेवारी, १५ ऑगस्ट, ३० जानेवारी शहीद दिन, १ मे महाराष्ट्र दिन, २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती, आषाढी व कार्तिकी एकादशी या निमित्त दारुबंदी असते. आता लोकांची मागणी असेल, तर आंबेडकर जयंती, बुद्धजयंती व इतर सणांच्या दिवशीही दारुबंदी करण्याचा विचार केला जाईल, त्यासंबंधीचे निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत, असे त्यांनी सांगितले.