राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या कामगार महर्षी गं. द. आंबेकर स्मृती जीवनगौरव पुरस्कारासाठी यंदा स्वातंत्र्य सैनिक व ज्येष्ठ गांधीवादी कामगार नेते डॉ. शांती पटेल यांची निवड करण्यात आली आहे. साहित्य, कला, क्रीडा व कामगार चळवळीत योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांनाही श्रमगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
रामिमसंचे अध्यक्ष व गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांच्या संकल्पनेतून गेल्या वर्षांपासून आंबेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कामगार चळवळीसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना जीवनगौरव पुरस्कार देण्याची प्रथा सुरू करण्यात आली. या वर्षीच्या पुरस्कारासाठी कामगार चळवळीतील, खास करून देशातील बंदर व गोदी कामगारांच्या न्यायहक्कांसाठी लढणारे ज्येष्ठ नेते डॉ. शांती पटेल यांची निवड करण्यात आल्याचे संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी जाहीर केले.
जीवनगौरव पुरस्काराव्यतिरिक्त लेखक-पत्रकार जयंत पवार, आदिवासी पाडय़ांमध्ये काम करणारे सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र पाटील, शाहीर यशवंत पवार, नवी मुंबईतील रासायनिक कारखान्यातील कामगार कार्यकर्ते जयंत करडे आणि  कोल्हापूरमधील वीज कामगारांचे नेते हिंदूराव पाटील यांची श्रम गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.