संसद भवनासारखी स्मारकाची इमारत बांधणार
इंदू मिलच्या जमिनीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या आराखडय़ात मोठे फेरबदल करण्यात आले. त्यानुसार आता संसद भवनाच्या प्रतिकृतीच्या स्वरूपात स्मारकाची पाच मजली १५० फूट उंच इमारत बांधण्यात येणार असून, त्यावर २०० फूट आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात येणार आहे, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.
इंदू मिलच्या साडेबारा एकर जमिनीवर उभारण्यात येणाऱ्या आंबेडकर स्मारकाच्या मूळ आराखडय़ाबाबत आंबेडकरी नेत्यांचे आक्षेप होते. त्या संदर्भात सामाजिक न्यायमंत्र्यांनी चार-पाच वेळा रिपब्लिकन नेत्यांच्या बैठका घेऊन त्यांची मते व सूचना जाणून घेतल्या. मंत्रालयात बुधवारी झालेल्या बैठकीत आराखडाच्या बदलावर चर्चा झाली. या बैठकीला रिपब्लिकन पक्षाचे नेते डॉ. राजेंद्र गवई, वास्तुविशारद शशी प्रभू, तसेच नगरविकास विभाग, मुंबई महानगरपालिका व मुंबई प्रदेश विकास क्षेत्र प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) अधिकारी उपस्थित होते.
हा पुतळा शांघायमधून बनवून आण्याचा विचार आहे. डिजिटल चलचित्राच्या स्वरूपात बाबासाहेबांचे जीवनचरित्र लोकांना बघायला मिळणार आहे. त्याचा समावेश स्मारकाच्या आरखडय़ात करण्यात आल्याची माहिती बडोले यांनी
दिली.

* सुधारित आराखडय़ानुसार स्मारकाची पाच मजली इमारत बांधण्यात येणार आहे.
’त्यात ग्रंथालय, वस्तुसंग्रहालय, चार हजार आसन क्षमता असलेले विपश्यना केंद्र, दीड हजार आसन क्षमतेचे सभागृह, शंभर भिख्खूंची वास्तव्याची व्यवस्था होईल, असे निवासस्थान व कला दालन यांचा समावेश असेल.
* १५० फूट इमारतींवर २०० फूट उंच बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात येणार आहे.