राज्यात दलितांवरील वाढत्या अत्याचारांच्या विरोधात वेगवेगळ्या फुले-आंबेडकरवादी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत.
रिपब्लिकन सेनेच्या नेतृत्वाखाली २८ मे रोजी अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा येथे मोर्चा निघणार आहे. तर त्याच दिवशी ‘फेसबुक आंबेडकराइट मूव्हमेंट’ या तरुणांच्या संघटनेच्या वतीने मुंबईत भायखळा ते आझाद मैदान असा हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा या गावी नितीन आगे या तरुणाची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली. त्यानंतर दलितांवरील अत्याचारांची मालिकाच सुरु आहे. मात्र सरकारने त्याची गांभीर्याने दखल घेतली नाही, असा आंबेडकरवादी कार्यकर्त्यांचा आरोप आहे. हा प्रश्न गांभीर्याने हाताळावा, असे अजूनही सरकारला वाटत नाही. त्यामुळे दलित समाजात असंतोष आहे. विधानसभा निवडणुकीत त्याचा फटका काँग्रेस-राष्ट्रवादीला बसल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा या संघटनांनी दिला आहे. याच असंतोषातून सरकारच्या विरोधात राज्यातआंदोलने सुरु आहेत, अशी माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ निकाळजे यांनी दिली.