२८ जुलै २०१८ रोजी अंबेनळी घाटात झालेल्या बस दुर्घटनेप्रकरणी एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये बसचा चालक बस थांबवून घाटामध्ये उतरत असल्याचं दिसत आहे. शेजारुन जाणाऱ्या एका गाडीतून हा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अंबेनळी घाटात बस कोसळण्याआधी घाटामध्ये थांबली असल्याचं या व्हिडीओमुळे समोर आले आहे. या बसवर प्रशांत भांबेड आणि बाबू झगडे हे दोन चालक होते. त्यापैकी बाबू झगडे हा बसच्या शेजारच्या दरवाजातून खाली उतरताना दिसत आहे. मात्र बाबू झगडे बसमधून उतरल्यानंतर नेमकं काय झालं? हे मात्र अजूनही समजू शकलेलं आहे.

पाहा व्हिडीओ :

२८ जुलैला दापोली कृषी विद्यापीठाचे कर्मचारी, विद्यार्थी आणि चालक असे मिळून ३४ जण बसने दापोली येथून महाबळेश्वर येथे सहलीसाठी निघाले होते. आंबेनळी घाटात एका वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळून ३३ जणांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातातून प्रकाश सावंत हे आश्चर्यकारकरित्या बचावले होते.

मुख्यमंत्र्यांनाही पाठवले होते पत्र
अपघाताच्या काही दिवसांनी मृतांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले होते. बस कोण चालवत होते, हे समोर येणे गरजेचे आहे, असे या पत्रात म्हटले होते. एकटेच प्रकाश सावंत कसे काय वाचले?, ते नेमके कुठे बसले होते?, ते एकटेच कसे बाहेर फेकले गेले?, शेवाळ लागलेल्या कातळावरुन ते कसे वर आले?, असे प्रश्नही यात विचारण्यात आले होते.