अंबरनाथ शहरात रिपाइंच्या एका कार्यक्रमासाठी आलेल्या केंद्रीय सामाजिक मंत्री रामदास आठवले यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद रविवारी अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरात पाहायला मिळाले. दुपापर्यंत दोन्ही शहरांतील बाजारपेठा आणि सर्व व्यवहार ठप्प होते. हल्ला करणाऱ्या प्रवीण गोसावी याला उपचारासाठी मुंबईच्या जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर आरोपीची चौकशी केली जाईल, असे परिमंडळ चारच्या पोलीस उपयुक्तांनी सांगितले आहे.

अंबरनाथ पश्चिमेतील एका कार्यक्रमात आलेल्या केंद्रीय मंत्री आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. हा हल्ला करणारा प्रवीण गोसावी हा रिपाइंचाच माजी पदाधिकारी असल्याची बाब आता समोर आली आहे. या घटनेनंतर गोसावीला कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली होती. सध्या प्रवीणवर मुंबईतील जे जे रुग्णालयात उपचार सुरू असून जमावाने केलेल्या हल्ल्यामुळे त्याच्या डोक्याला मार लागला असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहितीही रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्र्यांच्या सुरक्षेत कुचराई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी या वेळी करण्यात येत होती. या हल्ल्यामागे खरा सूत्रधार वेगळा असून त्याचाही शोध घेण्याची मागणी केली जात होती. या हल्ल्याच्या घटनेचे पडसाद रविवारी अंबरनाथ, उल्हासनगर या दोन्ही शहरांत बंद स्वरूपात पाहायला मिळाले.  दरम्यान हल्ला करणारा गोसावी हा गेल्या काही वर्षांत समाजमाध्यमातून आठवलेंवर टीका करत असल्याचेही समोर आले आहे.

आज शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार

हल्ल्याच्या निषेधार्थ रविवारी मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. या संदर्भात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे एक शिष्टमंडळ सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे.  आठवले यांनी या घटनेबद्दल पोलिसांवर ठपका ठेवला आहे. पोलिसांनी नीट बंदोबस्त ठेवला असता, तर ही घटना टळली असती, असे त्यांनी म्हटले आहे. आठवले यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ रविवारी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मुंबईत घाटकोपर, चेंबूर, मलबार हिल, दादर, वांद्रे इत्यादी ठिकाणी निदर्शने करण्यात आली.