शैलजा तिवले

करोना रुग्णाला रक्तद्रव उपचारासाठी परवानगी दिल्याने आता अनेक सरकारी प्रयोगशाळांसह खासगी प्रयोगशाळाही रक्तद्रव संकलन करत आहेत. परंतु यासाठी किती दर आकारले जावेत याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने १५ ते २० हजार रुपये सध्या आकारले जात आहेत.

दरम्यान, राज्यात आतापर्यत संकलित झालेल्या रक्तद्रवाची माहिती राज्य रक्तसंक्रमण परिषदेने सर्व रक्तपेढय़ांना देण्याची सूचना परिपत्रकाद्वारे केली आहे.

करोना मुक्त रुग्णाचे रक्तद्रव संकलित करण्याची नियमावली केंद्रीय औषध  मानके नियंत्रण विभागाने जाहीर केली. यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागानेही या उपचार पद्धतीच्या वापराला शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांना परवानगी दिली. रक्तद्रव संकलनासाठी प्रयोगशाळांना अन्न व औषध  प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. करोना काळात मुंबईतील ११ प्रयोगशाळांना याची परवानगी दिली असून यातील बहुतांश या सरकारी आणि खासगी रुग्णालयांशी निगडित असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

राज्यात ५० हून अधिक रक्तपेढय़ांना रक्तद्रव संकलनाची परवानगी दिली असून यात काही खासगी रक्तपेढय़ाही असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त अरुण उन्हाळे यांनी सांगितले.

रक्तद्रव संकलनाचा परवाना क्रमांक, आत्तापर्यत संकलित केलेल्या रक्तद्रवाची संख्या, कोणत्या रुग्णालयांना दिले आणि प्रक्रियेसाठी येणारा खर्च याची एकत्रित माहिती मंगळवारपर्यत देण्याची सूचना राज्य रक्त संक्रमण परिषदेने रक्तपेढय़ांना दिली आहे.

काही खासगी प्रयोगशाळांकडून रक्तद्रव रुग्णालयांना दिले जात आहे. नालासोपाऱ्यात एका खासगी प्रयोगशाळेकडून शासकीय रुग्णालयांकरिता १५ हजार रुपये तर खासगी रुग्णालयांसाठी २० हजार रुपये आकारले जात आहेत.

राष्ट्रीय रक्तसंक्रमण परिषदेने रक्तद्रवाच्या दराबाबत अद्याप  नियमावली जाहीर केली नसल्याचे राज्य रक्तसंक्रमण परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ. अरुण थोरात म्हणाले.

दरांचे गणित

रक्तामधून पेशी वेगळ्या करण्यासाठी आवश्यक संचाची किंमत सुमारे ८ हजारापर्यंत आहे. यासाठी ११ हजार रुपये किंमत आकारली जाते. रक्तद्रवाची प्रक्रियाही सर्वसाधारणपणे अशीच आहेत. त्यामुळे याचीही किंमती तेवढीच असणे अपेक्षित आहे. करोनामुक्त व्यक्तीच्या शरीरात योग्य पातळीचा रक्तद्रव तयार झाला आहे का याच्या काही चाचण्या कराव्या लागतील. त्यामुळे त्याचे दर वेगळे लावले जावेत, असे रक्तसंक्रमण विभागातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.