शैलजा तिवले

राज्याला लस प्राप्त झाली असली, तरी तिच्या वापराच्या निकषांबाबत कोणत्याही सूचना केंद्रीय किंवा राज्य स्तरावरून लसीकरण केंद्रांना प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे ही लस कोणाला द्यावी आणि कोणाला देऊ नये, याबाबत अस्पष्टता असून नियमावली जाहीर करण्याची मागणी केली जात आहे.

राज्यात ‘कोविशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्सीन’ या दोन लशी प्राप्त झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात राज्यातील ३५८ केंद्रावर आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. परंतु ही लस देण्याचे काय निकष असावेत. अनियंत्रित सहव्याधी असल्यास किंवा अन्य कोणती औषधे सुरू असल्यास ही लस देता येईल का, याबाबत अद्याप कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. तसेच पहिल्या मात्रेनंतर पुढील मात्रा कधी आणि कशी द्यावी याची माहिती अजून मिळालेली नाही, असे औरंगाबाद महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

लस देण्याआधी किती दिवस ताप आल्यास देऊ नये, अन्य कोणती आजाराची लक्षणे असल्यास लस दिली तर चालेल का, असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत. येत्या दोन दिवसांत याबाबत माहिती मिळण्याची शक्यता आहे. परंतु ही माहिती नियमावली स्वरुपात आल्यास सर्व ठिकाणी योग्य रितीने पोहचविणे सोपे होईल, असे आरोग्य आयुक्तालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

शंकानिरसनाची गरज

लशीचा वापर केल्यास होणारे फायदे, लशीची सुरक्षितता, लसीकरणाची गरज इत्यादी बाबत आरोग्य कर्मचाऱ्यांसह अनेक गटांमध्ये शंका आहेत. तेव्हा याची योग्य माहिती पोहचणे आणि लसीकरणाबाबत जनजागृती करण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे मुंबई पालिकेच्या विभागीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अधोरेखित केले.

‘कोव्हॅक्सीन’च्या वापराबाबत संभ्रम

* ‘कोव्हॅक्सीन’ लशीचा वापर तिसऱ्या टप्प्यातील चाचण्याअंतर्गत केला जाणार आहे. त्यामुळे चाचण्यांसाठी लागू असणारे सर्व नियम तेव्हा लसीकरणासाठी लागू असणार आहेत का, याबाबतही अजून संभ्रम असल्याचे आयुक्तालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

* केंद्रीय आरोग्य विभागासोबत बैठका सुरू असून पुढील दोन दिवसांत याबाबत अधिक स्पष्टता येईल. त्यानुसार आरोग्य केंद्राना माहिती दिली जाईल, असे आरोग्य विभागाचे प्रमुख सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.