भाजप, विरोधकांच्या आक्षेपामुळे खासगीकरणाचा प्रस्ताव फेटाळला

मुंबई : पालिकेच्या आठ रुग्णालयांसाठी हृदयरोग (कार्डियाक) आणि साध्या रुग्णवाहिका भाडेतत्त्वावर घेऊन या सेवेचे खासगीकरण करण्याचा प्रशासनाचा डाव भाजप आणि विरोधी पक्षांनी उधळून लावला. शिवसेना प्रस्ताव मंजूर करण्याच्या प्रयत्नात होती. मात्र विरोधी पक्षांना भाजपने साथ दिल्यामुळे मतदानाअंती हा प्रस्ताव फेटाळण्यात आला.

केईएम, नायर, लोकमान्य टिळक, कूपर, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, कस्तुरबा (बोरिवली), क्षयरोग, कस्तुरबा (भायखळा) या आठ रुग्णालयांसाठी पाच हृदयरोग आणि १८ साध्या रुग्णवाहिका भाडेतत्त्वावर घेण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीच्या बुधवारच्या बैठकीत सादर केला होता. या रुग्णवाहिकांसाठी तब्बल नऊ कोटी ९६ लाख ६९ हजार रुपये पालिकेला मोजावे लागणार होते. या प्रस्तावाला भाजप नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी आक्षेप घेतला. पालिकेने भाडेतत्त्वाऐवजी स्वत:च या रुग्णवाहिकांची खरेदी करावी, अशी मागणी त्यांनी केली. पूर्वी किती रुग्णवाहिका होत्या, किती रुग्णांनी त्याचा लाभ घेतला याची माहिती न देताच प्रशासनाने हा प्रस्ताव आणला असून केवळ कंत्राटदाराचे खिसे भरण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला. या प्रस्तावात रुग्णावाहिकेसाठी लागणारे डॉक्टर, परिचारिका आणि अन्य कर्मचाऱ्यांचा उल्लेखच नाही, असा आक्षेपही घेण्यात आला.

भाजपसह काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी या प्रस्तावाला कडाडून विरोध केला. मात्र रुग्णवाहिकेतील डॉक्टर, परिचारिका आणि अन्य कर्मचाऱ्यांवरील खर्चाचा नऊ कोटी ९६ लाख ६९ हजार रुपयांमध्ये समावेश असल्याची बाब विषद करीत शिवसेनेने या प्रस्तावाला पाठिंबा दिला. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधवही हा प्रस्ताव मंजूर करण्याच्या तयारीत होते. मात्र भाजप आणि विरोधकांनी केलेल्या विरोधामुळे अखेर जाधव यांनी या प्रस्तावावर मतदान घेतले. भाजप आणि विरोधी पक्षांनी प्रस्तावाच्या विरोधात मतदान केल्यामुळे अखेर जाधव यांना तो फेटाळावा लागला.

सामाजिक संस्थांचा विचार नाही

एका कंपनीने सामाजिक उत्तरदायित्व निधीतून शीव रुग्णालयाला एक हृदयरोग रुग्णवाहिका विनामूल्य देण्याची तयारी दाखविली होती. मात्र प्रशासनाने त्यास नकार दिल्याची बाब राजा यांनी सदस्यांच्या निदर्शनास आणून दिली. मुंबईत अनेक संस्था नागरिकांना विनाशुल्क रुग्णवाहिकेची सेवा देत आहेत. अशा संस्थांना  रुग्णवाहिका सेवेबाबत विचारणा करण्यात आली का, असा सवाल करीत भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी या प्रस्तावाचा फेरविचार करावा अशी उपसूचना मांडली.