मुंबईतील रुग्णांचे हाल; राजकीय पक्षांच्या रुग्णवाहिका गायब

संदीप आचार्य, लोकसत्ता

मुंबई : दीपक आपल्या गर्भवती पत्नीला घेऊन जेमतेम एका रुग्णालयात पोहोचला. तिथे उपचार होणार नाहीत, असे समजल्यावर दुसऱ्या रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिका शोधत होता. अनेक तासांच्या शोधानंतर काही हजार रुपये मोजले तेव्हा एक रुग्णवाहिका मिळाली. मुंबईत एकीकडे बिगरकरोना रुग्णांना उपचार मिळण्याची मारामार आहे तर दुसरीकडे रुग्णवाहिकाही मिळत नाही, अशी अवघड परिस्थिती आहे.

राजेशला सीएसएमटीहून केईएममध्ये जायचे होते. १०८ क्रमांकावर फोन केला तर किमान सव्वा तास यायला लागेल असे उत्तर मिळाले. अखेर राजेशनेही कशीबशी एक रुग्णवाहिका मित्राच्या मदतीने मिळवली खरी, परंतु त्यासाठी तब्बल साडेतीन हजार रुपये मोजावे लागले. मुंबईत आज जवळपास प्रत्येक रुग्णाचे रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने हाल होत आहेत. एरवी मुंबईत जागोजागी पक्षाचे झेंडे लावलेल्या शेकडो रुग्णवाहिका गल्लीबोळात फिरत असतात. मात्र सर्वच राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या रुग्णवाहिका सध्याच्या काळात गायब झालेल्या दिसत आहेत.

राजकीय पक्षांच्या रुग्णवाहिकांना फोन केला तर रुग्णवाहिका गॅरेजमध्ये असल्याचे ठरलेले उत्तर मिळते. बहुतेक या सर्व रुग्णवाहिकांना करोनाची लागण झाली असावी, अशी मार्मिक टिप्पणी ठाण्यातील रहिवासी संदीप पाटणकर यांनी केली. यातील गमतीचा भाग सोडला तरी रुग्णवाहिकेचे चालक तसेच मदतनीस यांनाही करोनाच्या भीतीचा विळखा असल्यानेच खासगी किंवा पक्षीय रुग्णवाहिका फारशा रस्त्यांवर दिसत नाहीत. ज्या थोडय़ाफार रुग्णवाहिका रुग्णांना घेऊन जातात ते अवाच्या सवा पैसे आकारतात.

मुंबई महापालिकेकडे आज १०८ सेवेअंतर्गत केवळ ६० रुग्णवाहिका उपलब्ध असल्याचे पालिकेच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. यातील बहुतेक रुग्णवाहिका संस्थात्मक अलगीकरणासाठी लोकांची ने-आण करण्यात जास्त गुंतलेल्या असतात. १०८ क्रमांकाची सेवा चालविणाऱ्या संस्थेने मुंबईसाठी आणखी ५० रुग्णवाहिका देण्याची तयारी दाखवली असली तरी याबाबत अद्यापि निर्णय झाला नसल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले. रुग्णवाहिका चालवायला व सांभाळायला चालक-मदतनीस मिळत नसल्याने त्या सेवेत दाखल करून घेण्यास अडचणी असल्याची माहिती मिळाली.

महापालिकेच्या केईएम, शीव, नायर रुग्णालय तसेच जे जे रुग्णालयांशी एरवी किमान ५० हून अधिक रुग्णवाहिका जोडलेल्या असतात. या रुग्णवाहिकांच्या चालकांना फेरीसाठी थोडी जास्त रक्कम पालिकेने दिली आणि त्यांच्या आरोग्याचा विचार करून करोना पोशाख व मास्क दिले तर मोठय़ा संख्येने रुग्णवाहिका उपलब्ध होतील. यांचे नियमन पालिकेच्या १९१६ या नियंत्रण कक्षातून करता येईल. मात्र त्यासाठी पालिकेतील उच्चपदस्थांची व नेतृत्वाची इच्छाशक्ती हवी, असे बालरोगतज्ज्ञ डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितले.

बेस्टच्या २० रुग्णवाहिका

महापालिकेत विशेष नियुक्ती करण्यात आलेल्या मनीषा म्हैसकर यांना विचारले असता त्या म्हणाल्या, रुग्णवाहिका कमी पडतात हे खरे असले तरी आम्ही त्याची लवकरच व्यवस्था करत आहोत. बेस्टनेही आम्हाला सध्या सात बस रुग्णवाहिकेत परावर्तित करून दिल्या असून लवकरच आणखी २० बस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याशिवाय एसटी महामंडळाकडूनही १५ बस येणार असून त्यांचा वापर प्रामुख्याने संस्थात्मक अलगीकरणासाठी केला जाईल. सध्या आमच्याकडे १०८ क्रमांकाच्या ६० रुग्णवाहिका असल्या तरी रुग्णवाहिकांची संख्या लवकरच वाढविण्यात येईल, असे म्हैसकर यांनी सांगितले.

मुंबईत रुग्णवाहिकांचा तुटवडा झाल्यामुळे करोनाचे व अन्य रुग्णांचे कमालीचे हाल होत आहेत. रुग्णवाहिका चालवणारीही माणसेच असून त्यांच्या आरोग्याचा विचार करून त्यांना पालिकेने मास्क व करोना संरक्षित पोशाख दिला पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची हमी घेतल्यास काही प्रमाणात खासगी रुग्णवाहिका तसेच पक्षाच्या रुग्णवाहिका तयार होतील. पालिका नियंत्रण कक्षात अशा रुग्णवाहिकांची नोंद करून त्यांना थोडे जास्तीचे मानधन दिल्यास रुग्णांची होणारी फरफट संपेल. त्याचप्रमाणे प्रत्येक रुग्णालयात रुग्णवाहिका डेस्क तयार करून तेथूनही रुग्णांसाठी मदत करण्याची गरज आहे.

– राजेश टोपे, आरोग्यमंत्री