पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलच्या डब्यात घुसून एका अज्ञात व्यक्तीने अमेरिकन महिलेवर ब्लेडने हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी घडली. यावेळी डब्यात हजर असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने तिला वाचवण्यासाठी कोणतीही मदत केली नसल्याचेही पोलीस तपासात उघड झाले आहे.
मिशेल मार्क नावाची ही २४ वर्षीय महिला गेल्या तीन वर्षांपासून कामासाठी भारतात वास्तव्यास आहे. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ती चर्चगेटहून बोरिवलीला जाणाऱ्या लोकलच्या प्रथम श्रेणीच्या डब्यातून प्रवास करत होती. मरीन लाइन्स आणि चर्नीरोड स्थानकादरम्यान डब्यात शिरलेल्या एका अज्ञात व्यक्तिने तिच्या हातातील मोबाइल व पर्स हिसकावण्यासाठी तिच्यावर झडप घातली व ब्लेडने तिच्या हातावर व चेहऱ्यावर वार केले. जखमी मिशेलवर नायर रुग्णालयात उपचार करून तिला घरी सोडण्यात आले.
दरम्यान, घटना घडली तेव्हा डब्यात असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाच्या नरेंद्र यादव या कॉन्स्टेबलने मिशेलला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही, असे तपासात उघड झाल्याचे चर्चगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्रिवेदी यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 19, 2013 1:18 am