‘पापा कहते हैं बडा नाम करेगा.. ’ म्हणत रूपेरी पडद्यावर पदार्पण करणाऱ्या चॉकलेट बॉय आमिर खानने त्याकाळी तरुणाईला वेड लावले होते. १९८८ साली आलेल्या ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटातून आमिर आणि जुही चावला या दोन कलाकारांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. या चित्रपटानंतर आमिरने कधी मागे वळून पाहिले नाही. एकीकडे यावर्षी हिंदी चित्रपटसृष्टीला शंभर वर्ष पूर्ण होत असतानाच आमिरनेही आपल्या बॉलिवूड कारकिर्दीची २५ वर्ष पूर्ण केली आहेत. ‘कयामत से कयामत तक’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन २५ वर्ष पूर्ण झाली. पर्यायाने, याच चित्रपटातून हिंदीत पाऊल ठेवणाऱ्या आमिर आणि जुहीनेही आपल्या कारकिर्दीची पंचवीस पूर्ण केली आहेत. हा पंचविशीचा आनंद साजरा करावा यासाठी आमिरने सोमवारी ‘कयामत से कयामत तक’च्या संपूर्ण टीमसाठी पार्टीचे आयोजन केल्याचे सूत्रांकडून समजते.
‘कयामत से कयामत तक’ हा चित्रपट आमिरचे काका मन्सूर यांनी दिग्दर्शित के ला होता. आज पंचवीस वर्षांनी या चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शकांपासून तंत्रज्ञांपर्यंत सगळ्यांबरोबर ‘कयामत से कयामत तक’ हा चित्रपट पाहिला जाणार आहे. यासाठी पहिल्यांदा ही टीम आमिरसह फरहान अख्तर आणि रितेश सिधवानीच्या ‘लाईटबॉक्स’ या प्रिव्ह्यू थिएटरमध्ये एकत्र भेटणार आहे. तिथे चित्रपट पाहून झाल्यानंतर मग ही टीम नासिर हुसैन यांच्या बंगल्यावर जिथे सध्या आमिरचा भाचा आणि अभिनेता इम्रान खानचे वास्तव्य आहे तिथे एकत्र जमून पार्टी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आमिरच्या ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटाबरोबरच अनिल कपूरचा ‘तेजाब’, अमिताभ बच्चन यांचा ‘शहेनशहा’ आणि राकेश रोशन दिग्दर्शित ‘खून भरी मॉंग’ हे चित्रपट प्रदर्शित झाले होते त्यामुळे या चित्रपटांसाठीसुध्दा हे रजतमहोत्सवी वर्ष आहे. तर अभिनेता सलमान खानने ‘बीवी हो तो ऐसी’ या चित्रपटातून १९८८ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण के ले होते पण त्याला खरी ओळख मिळाली ती १९८९ साली प्रदर्शित झालेल्या राजश्री प्रॉडक्शनच्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटामुळे. म्हणून खऱ्या अर्थाने, सोमवारचा दिवस हा आमिरच्या कारकिर्दीच्या पंचविशीचा आहे.