सहानभुतीचा फायदा व्हावा या उद्देशानेच पालघर मतदारसंघातील पोटनिवडणुकीकरिता शिवसेनेने दिवंगत आमदार कृष्णा घोडा यांचा मुलगा अमित याला रविवारी उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपने पाठिंबा दिल्याचा दावा शिवसेनेने केला आहे.
अमित घोडा यांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर केल्याचे शिवसेना उपनेते अनंत तरे यांनी जाहीर केले. या मतदारसंघात २७ जूनला पोटनिवडणूक होणार आहे. या मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन सर्व राजकीय पक्षांना करण्यात आल्याचेही तरे यांनी सांगितले. पालघरमध्ये भाजपचा शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांनी पाठिंबा दर्शविल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले. गेल्या ऑक्टोबर महिन्यात झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झालेले कृष्णा घोडा अवघ्या ५०० मतांनी विजयी झाले होते.  पालघरमध्ये गेल्या वेळी घोडा यांचा निसटता विजय झाला होता.
या पाश्र्वभूमीवर त्यांच्या मुलाला रिंगणात उतरवून शिवसेनेने सहानभुतीचा लाभ उठविण्याचा प्रयत्न केला आहे.