भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भूमिका; उद्धव यांची भेट नित्याची बाब

शिवसेनेला आम्ही सहन करायचा प्रश्नच नाही, असे ठणकावत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी ‘आपल्या दृष्टिकोनातून विचार करून दोन पक्ष युती करतात, ती कोणाचीही अपरिहार्यता (मजबुरी) नसते’ असे स्पष्ट केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवारी होणार असलेली भेट म्हणजे माझ्यासाठी ‘नित्याची बाब’ (रुटीन अफेअर्स) असल्याची टिप्पणी करीत या भेटीला फारसे राजकीय महत्त्व देण्याची गरज नसल्याचे सूचित केले. शिवसेनेकडून पंतप्रधान, मुख्यमंत्री, भाजपवर जोरदार टीका होते, मागण्या केल्या जातात, त्याबाबत विचारता ‘मी रोज सायंकाळी शिवसेना सरकारमध्ये आहे ना, असे विचारतो आणि ते केंद्रात व राज्यात आजही सत्तेत आहेत, ही वस्तुस्थिती आहे,’ अशी खिल्ली उडवत शहा यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ‘मार्मिक’ टोला लगावला. धर्माच्या आधारावर ध्रुवीकरण ही भाजपची भूमिका नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेना आमचा सहकारी पक्ष असून त्यांच्यामुळे आमची कोणतीही अडचण नाही, असे सांगून ठाकरे यांच्या भेटीविषयी शहा म्हणाले, मी आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू, पंजाबमध्ये प्रकाशसिंह बादल यांना भेटलो. महाराष्ट्रात रालोआतील घटकपक्षांचे नेते रामदास आठवले, महादेव जानकर, विनायक मेटे, विनय कोरे यांना भेटलो. ठाकरे हे नवी दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या रालोआच्या बैठकीसाठी आले होते, तेव्हाही त्यांच्याशी स्वतंत्र भेट झाली होती. त्यामुळे अशा भेटी ही ‘नित्याची बाब’ (रुटीन अफेअर्स) असते, असे शहा यांनी स्पष्ट केले. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत शिवसेना भाजपबरोबर राहत नसल्याचा अनुभव आहे, या वेळीही तसे होईल का, असे विचारता ‘मी काही ज्योतिषी नाही, पण निवडणूक काही फार लांब नाही,’ असे शहा यांनी हसत हसत सांगितले.

..तर रालोआत नवा पक्ष

शिवसेनेला पर्याय म्हणून राज्यात रालोआमध्ये एखाद्या पक्षाचा समावेश होऊ शकतो का, असे विचारता शहा यांनी पर्याय म्हणून कोणाचाही समावेश करणार नाही, असे स्पष्ट केले. महाराष्ट्रात सध्या तरी कोणी दिसत नाही, पण कोणी दिसल्यास सर्वाशी चर्चा करून रालोआत समावेश केला जाऊ शकतो, अशी टिप्पणी केली. मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून काही वेळा सल्ला घेतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते, त्यामुळे त्यांच्याबाबत काय, असे विचारता ‘मार्गदर्शक कोणीही असू शकतो. राज्यात दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात लढतात,’ असे शहा यांनी स्पष्ट केले.

आधीच्या सरकारमुळे..

शेतकरी कर्जमाफीचा निर्णय प्रत्येक राज्याने तेथील समस्या व आर्थिक परिस्थितीचा विचार करून घ्यायचा आहे, असे नमूद करून कर्जमाफीबाबतच्या विविध प्रश्नांवर उत्तरे देताना शहा म्हणाले, महाराष्ट्रात आधीच्या सरकारने १५ वर्षांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी फारसे काही न केल्याने त्यांची स्थिती वाईट होती. येथे कृषीचा विकासदर उणे ८ टक्के होता. तो आता वाढला असून २० टक्के झाल्यावर पाच वर्षांनंतर कोणालाही काही करण्याची गरज उरणार नाही. उत्तर प्रदेशच्या धर्तीवर गुजरात व अन्य राज्यांच्या पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांमध्येही कर्जमाफीचे आश्वासन देणार की उत्तर प्रदेश व महाराष्ट्रातील अनुभव लक्षात घेऊन भूमिका बदलणार, असे विचारता प्रत्येक राज्यातील परिस्थिती पाहून निर्णय होईल. महाराष्ट्रात आम्ही विरोधी पक्षात होतो, पण येथे निवडणूक जाहीरनाम्यात कर्जमाफीचे आश्वासन दिले नव्हते. गुजरातमध्ये व अन्यत्र आमची सरकारे चांगली चालली आहेत, असे सांगत तेथे कर्जमाफीचे आश्वासन निवडणुकीत दिले जाणार नसल्याचे संकेत दिले.

असहिष्णुतेचे वातावरण कुठे?

गोहत्या बंदीवरून उद्रेक, असहिष्णुता, पुरस्कारवापसी अशा अनेक बाबी भाजप सरकारच्या कारकीर्दीत घडत आहे, या संदर्भात विचारता ‘देशात असहिष्णुतेचे वातावरण आहेच कुठे, त्याबाबत काही पावले टाकण्याचा प्रश्नच नाही, असे नमूद केले. आता पुरस्कारवापसीचे प्रकार का होत नाहीत, असा सवाल करीत आता वातावरण बदलले आहे, बिहारची निवडणूक संपली, अशी टिप्पणी शहा यांनी हसत हसत केली. बिहारमधील बाबी उत्तर प्रदेश निवडणुकीच्या वेळी सुधारल्या, असेही त्यांनी मिश्कीलपणे सांगितले.

धार्मिक ध्रुवीकरण नाही

भाजपची मूळ हिंदूत्वाची भूमिका पुन्हा आक्रमकपणे पुढे येऊ लागली आहे का, आधीच्या निवडणुकीत विकासाच्या मुद्दय़ावर मते मिळविल्यावर २०१९ च्या निवडणुकांसाठी हिंदूुत्वाच्या आधारावर धार्मिक ध्रुवीकरण करून मते मिळविण्याची रणनीती आहे का, मुस्लीमविरोधी वातावरण असल्याचे चित्र आहे, आदी प्रश्नांना उत्तरे देताना शहा म्हणाले, ‘धर्माच्या आधारावर ध्रुवीकरण ही भाजपची मूळ भूमिका नाही. भाजपची १३ राज्यांमध्ये सरकारे आहेत. तेथे मोठय़ा प्रमाणावर मुस्लीम लोकसंख्या आहे आणि कोणाचीही तक्रार नाही. विकास हाच आमचा मुख्य मुद्दा आहे.

प्रत्येक मतदारसंघामध्ये भाजपची ताकद वाढविणार

राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये पक्षाची ताकद वाढविण्यात येणार असल्याचे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी जाहीर केल्याने शत-प्रतिशत सत्तेसाठी भाजपची तयारी सुरू झाल्याचे मानले जाते. लोकसभा निवडणुकीनंतर गेल्या तीन वर्षांत सर्वच निवडणुकांमध्ये पक्षाला चांगले यश मिळाल्याने मध्यावधी निवडणुका झाल्याच तर भाजपलाच कौल मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शेतकरी आंदोलन किंवा अन्य महत्त्वाचे प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगल्या पद्धतीने हाताळले आहेत. फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार चांगले काम करीत असल्याचे प्रशस्तिपत्रही शहा यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिले.

शहा म्हणाले..

  • सहकारी पक्षाची ताकद कमी-जास्त झाली तरी रालोआतील घटकपक्षांशी नाते कायम
  • उत्तर प्रदेशमध्ये भाजपला प्रचंड बहुमत मिळूनही घटकपक्ष सत्तेत सहभागी
  • काश्मीर प्रश्नही नियंत्रणात, काही महिने वेगळे काढून त्यावरून मूल्यमापन करू नये
  • बँक योजनेतून सात कोटी २८ लाख तरुणांना १० हजार ते १० लाख कर्ज देऊन रोजगारनिर्मिती