भाजपचे अध्यक्ष अमित शहा बुधवारी दोन दिवस मुंबई दौऱ्यावर असून महासंपर्क अभियानासह अनेक महत्त्वाच्या संघटनेच्या बाबींचा ते आढावा घेणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि महामंडळांचे वाटप रखडले असून त्यांचा हिरवा कंदील मिळाल्यावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत निर्णय घेतील, असे सूत्रांनी सांगितले. महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर अमित शहा मुंबईत येत असून ते याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह काही मंत्र्यांशीही चर्चा करणार आहेत. आरोपसत्रामुळे भाजपच्या प्रतिमेवर परिणाम होत असून तो रोखण्यासाठी पावले टाकण्यासाठी ते मार्गदर्शन करणार आहेत. शहा हे बुधवारी सायंकाळी मुंबईत येत असून दोन दिवसांत ते पक्षाचे पदाधिकारी आणि खासदार-आमदारांशी चर्चा करतील. महाराष्ट्र व गोव्यातील महासंपर्क अभियानाच्या प्रगतीचा आढावा शहा हे रंगशारदा सभागृहात आयोजित केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत गुरुवारी घेणार आहेत.