मुंबई : ठरल्याप्रमाणे निम्म्या जागा मिळणार नसतील तर युती कठीण असल्याचे दिवाकर रावते यांचे विधान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्थिर सरकार बहुमताने निवडून आणण्याचे आवाहन यामुळे युतीचे भवितव्य काय अशी चर्चा सुरू झाली असून रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यात याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीचा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. जागावाटपाची विविध समीकरणे चर्चेत येत आहेत. ठरल्याप्रमाणे जागा मिळणार नसतील तर युती कठीण असल्याचे विधान शिवसेनेचे नेते व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले. त्यावर जागावाटपाच्या चर्चेत अधिकार नसलेल्यांनी युतीबाबत बोलू नये असा टोला भाजपचे नेते व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी लगावला. त्यामुळे युतीत कुरबुरींवर शिक्कामोर्तब झाले. ‘फडणवीस यांनी बहुमत नसलेले अस्थिर सरकार चांगल्यारितीने चालवले. आता त्यांना बहुमताचे सरकार द्या’, असे आवाहन नंतर दुपारी नाशिकमधील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्यातून भाजपला केंद्राप्रमाणे राज्यातही बहुमतासाठी घटक पक्षांच्या कुबडय़ांची गरज नसलेले स्पष्ट बहुमताचे सरकार हवे असल्याचा संदेश मोदी यांनी थेटपणे दिला. तसेच राम मंदिरावरून काही जण मोठय़ा बाता मारत असल्याचा टोला मारला. राम मंदिराची पहिली वीट रचण्यासाठी शिवसैनिकांनी तयार रहावे, असे विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतेच पक्षाच्या बैठकीत केले होते. मोदी यांनी त्यावरूनच उद्धव यांच्यावर निशाणा साधल्याचे मानले जात आहे.

भाजप-शिवसेनेत ही तणातणी सुरू असताना रविवार २२ सप्टेंबर रोजी काश्मीरवरील कलम ३७० रद्द करण्याबाबत मुंबई भाजपतर्फे आयोजित व्याख्यानासाठी केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबईत येत आहेत. गोरेगाव येथे सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर अमित शहा हे युतीच्या जागावाटपाच्या चर्चेत लक्ष घालतील.