राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन झाल्यावर आता एक-दीड महिना उलटल्यावर अमित शहा मुंबईत दाखल झाले असून सरकारचा कारभार आणि पक्षसंघटनेची झाडाझडती ते घेणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यासह काही नेत्यांशी मंत्रिमंडळ विस्तार, मंत्र्यांमधील समन्वय, पक्ष व सरकारमधील दुवा अशा महत्त्वाच्या विषयांवर त्यांची चर्चा होणार आहे. शहा हे सुकाणू समितीची बैठकही शुक्रवारी सकाळी घेणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्षपदाबाबतही लवकरच घोषणा अपेक्षित आहे.
सदस्यता नोंदणीसह पक्षसंघटना बळकट करण्यासाठी ते संबंधितांशी चर्चा करणार आहेत. राज्यातील सर्व आमदार-खासदारांची बैठकही मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. त्यात शहा हे मार्गदर्शन करणार असून पक्ष सदस्य नोंदणी वाढविण्यासाठी प्रयत्न वाढविण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत. राज्यात एक कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असून अजूनपर्यंत २० टक्के म्हणजे २० लाखांपर्यंत वाटचाल झाली आहे. हा वेग वाढविण्यासाठी आमदार, खासदार आदींना उद्दिष्टे  ठरवून देण्यात आली आहेत.