भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह शनिवारी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत अमित शाह यांनी शिवसेना सोबत असावी ही आमची इच्छा आहेच असे वक्तव्य केले. त्यावरूनच २०१९ च्या निवडणुकांसाठी भाजपा आणि शिवसेना एकत्र येण्याबाबत अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात भेट होऊन त्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

२०१९ चे घोडामैदान जवळ आल्याने भाजपाने आता मित्र पक्षांशी पुन्हा गोड बोलण्यास सुरुवात केली आहे. आपल्या घटक पक्षांची नाराजी दूर करण्यासाठी ही नीती वापरली जाते आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे शुक्रवारी भाजपाच्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमासाठी मुंबईत आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी भाषणही केले आणि पत्रकार परिषदही घेतली. या पत्रकार परिषदेत अमित शाह यांनी शिवसेना सोबत असावी अशी इच्छा आहे असे म्हटले.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मातोश्रीला भेट देतात ही परंपरा आहे. दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा सलोख्याचे संबंध निर्माण व्हावेत आणि दोन्ही पक्षांनी एकमेकांशी युती करूनच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवाव्यात असा भाजपाचा मानस आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही भेट होण्याची शक्यता आहे. इकॉनॉमिक्स टाइम्सने या संदर्भातले वृत्त दिले आहे. उद्या ही भेट झाली तर या दोघांमध्ये चर्चा काय होणार, या चर्चेनंतर उद्धव ठाकरे स्वबळाचा नारा मागे घेणार का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकणार आहेत.