मध्यावधी निवडणुकांना तयार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर आज, भाजप अध्यक्ष अमित शहा यांनीही मध्यावधी निवडणुका झाल्याच तर, आम्हाला लढावंच लागेल. मैदान सोडून तर जाता येणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. निवडणुका झाल्याच तर भाजपच जिंकेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

भाजप अध्यक्ष शहा हे मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. उद्या, रविवारी ते राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या भेटीआधीच त्यांनी मध्यावधी निवडणुकांसाठी आम्ही तयार असल्याचं सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमधील संबंधांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. अशा वेळी सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा अनेकदा शिवसेना नेत्यांनी दिला आहे. तसंच मध्यावधी निवडणुकांचे संकेतही त्यांनी दिले आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अलिकडेच मध्यावधी निवडणुकांसाठी भाजप सज्ज आहे, असं म्हटलं होतं. त्याबाबत अमित शहा यांना पत्रकार परिषदेत विचारलं. त्यावर मध्यावधी निवडणुका झाल्याच तर आम्हाला लढावंच लागेल. मैदान सोडून जाता येणार नाही, असं ते म्हणाले. याशिवाय निवडणुका झाल्याच तर भाजपचाच विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. शिवसेनेसोबतच्या वादाबाबत विचारलं असता, तुम्हाला आतील गोष्टी सांगू असं वाटतंय का, असा प्रतिप्रश्न करून या मुद्द्याला बगल दिली.

यावेळी त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरही भाष्य केलं. उमेदवाराच्या नावाला सहमती मिळवण्यासाठी विरोधी पक्षांशी चर्चा सुरू आहे. त्यांच्याकडूनही सूचना मागवल्या जात आहेत. त्याचाही विचार करण्यात येत आहे, असं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकारचंही कौतुक केलं. मी मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आलो नाही. पण एकूणच पाहिलं तर भाजपचे मंत्री चांगलं काम करत आहेत. याशिवाय शेतकरी आंदोलन त्यांनी चांगल्या प्रकारे हाताळलं आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारची पाठ थोपटली. दरम्यान, शहा यांनी मोदी सरकारने तीन वर्षांत केलेल्या कामाचीही माहिती दिली. मोदी सरकारनं तीन वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेला दिशा आणि गती दिली. सरकारवर आतापर्यंत एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही, असंही त्यांनी सांगितलं. महिला, आदिवासी, गरिबांसाठी आणलेल्या योजनांचाही त्यांनी उल्लेख केला. काळा पैसा आणि बेनामी संपत्तीविरोधात सरकारनं महत्त्वाची पावले उचलली, असंही त्यांनी सांगितलं. मोदी सरकारनं या तीन वर्षांत जनतेच्या मनात देशाविषयी विश्वास निर्माण केला, असंही ते म्हणाले.