राष्ट्रपतीपदाची निवडणूक आणि राज्यात शिवसेना आणि भाजपमध्ये निर्माण झालेली दरी या पार्श्वभूमीवर मुंबईत दाखल झालेले भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेसोबतचे वाद संपुष्टात आणून संवाद साधण्यासाठीच आलो आहोत, असे संकेत दिले आहेत. शहा ‘मातोश्री’वर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्याआधीच त्यांनी शिवाजी पार्कमध्ये जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेऊन त्यांना आदरांजली वाहिली. शहा यांनी बाळासाहेबांना अभिवादन करून शिवसेना आणि शिवसैनिकांचे मन जिंकण्याचा प्रयत्न केला आहे, असे बोलले जाते.

अमित शहा सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांचं मुंबई विमानतळावर आगमन झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित शहा, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह भाजप नेत्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. शहा यांच्या आगमनानिमित्त भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. शहा मुंबई विमानतळावरून थेट दादर येथील चैत्यभूमीवर गेले. तेथे त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर शिवाजी पार्कातील वीर सावरकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर त्यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे याच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले आणि त्यांना आदरांजली वाहिली. शहा यांनी बाळासाहेबांना अभिवादन करून शिवसेनेचे मन जिंकण्याचा प्रयत्न केला आहे, असे जाणकारांना वाटते. मुंबई दौऱ्यात ते रविवारी ‘मातोश्री’वर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले असून शहा ‘मनभेद’ दूर करून ‘मनपरिवर्तन’ करण्यात यशस्वी ठरतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.