मुंबई दौऱ्यावर आलेले भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बैठक संपली असून अमित शहा सहयाद्री अतिथीगृहाच्या दिशेने रवाना झाले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये मोताश्रीच्या दुसऱ्या मजल्यावर तब्बल पावणेदोन तास चर्चा झाली. नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ ही चर्चा चालली. नेमके या बैठकीत काय ठरले ते समजू शकलेले नाही. आगामी लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही बैठक महत्वाची होती.

मागच्या चारवर्षांपासून शिवसेना-भाजपा युतीमध्ये निर्माण झालेली कटुता संपवण्यात अमित शहांना यश येणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण भाजपाकडून मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीला कंटाळून शिवसेनेने एकला चलो रे चा नारा दिला आहे.

भविष्यात सर्व निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा शिवसेनेने आधीच केली आहे. शिवसेना आता माघार घेऊन भाजपाशी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी करणार का ? मातोश्रीवरुन आज युतीसाठी सकारात्मक संदेश जाणार का ? याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान शहा यांच्या स्वागतासाठी मातोश्रीवरही खास ढोकळा, खांडवी हे गुजराती मेनू ठेवण्यात आला आहे. मातोश्रीवर जाण्याआधी शहा यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाजपा-शिवसेना युती होणारच, मित्र पक्षांमध्ये आपसात कुरबुरी होत असतात असे अमित शहा यांनी म्हटले आहे. २०१९ च नाही तर २०२४ ची निवडणूकही शिवसेनेसोबत लढवू. उद्धव ठाकरेंशी चर्चा करुन त्यांची नाराजी दूर करु असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला.