भाजपाध्यक्ष अमित शाह उद्या मुंबईत येणार असून यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. अमित शाह मातोश्रीवर जाऊन संध्याकाळी ६ वाजता उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. यावेळी अमित शाह २०१९ निवडणूक एकत्र लढण्यासंबंधी उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार असल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीला उपस्थित असण्याची शक्यता आहे. बैठकीबद्दल सध्या गुप्तता पाळली जात आहे.

मुंबईत आल्यावर मातोश्रीवर जाण्यास नेहमी टाळाटाळ करणारे अमित शाह मातोश्रीवर जात असल्या कारणाने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढण्याची भाषा करत होते. पालघर पोटनिवडणुकीनंतर दोन्ही पक्षातील संबंध कमालीचे ताणले होते. उद्धव ठाकरे युती तोडतील अशी चर्चा सुरु होती, मात्र तसं काही झालं नाही. भाजपा मात्र कर्नाटक विधानसभा तसंच पोटनिवडणुकीतील पराभवानंतर बॅकफूटवर जाताना दिसत आहे. याचाच भाग म्हणून स्वत: अमित शाह उद्धव ठाकरेंसोबत युती कायम ठेवण्याबद्दल चर्चा करणार असल्याचं बोललं जात आहे.

दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मात्र शिवसेना काही झालं तरी एकला चलो रे ही भूमिका सोडणार नसल्याचं सांगितलं आहे. जर पालघर पोटनिवडणुकीमुळे भाजपा युती करण्याचा विचार करत असेल तर हे फारच दुर्देवी आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम राहतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

२०१९ निवडणुकीत पराभव करण्यासाठी विरोधक एकत्र आले असल्याने भाजपाची काही प्रमाणात कोंडी झाल्याचं चित्र आहे. त्यात मित्रपक्षांनी साथ सोडू नये यासाठी आता मोदी आणि शाह यांनी प्रयत्न सुरु केल्याचं दिसत आहे. नरेंद्र मोदी यांच्या आदेशानंतरच अमित शाह मुंबईत येऊन उद्धव ठाकरेंशी युती कायम राखण्यासंबंधी चर्चा करणार असल्याचं समजत आहे. अमित शाह यांनी युतीसाठी हात पुढे केला तर उद्धव ठाकरे आपली भूमिका कायम ठेवणार की नमती भूमिका घेणार हे पहावं लागेल.