पाच वर्षे सरकारमध्ये राहण्याचे उद्धव यांचे अमित शहांना आश्वासन; भाजपचा दावा

सत्तेत सहभागी असताना विरोधकांप्रमाणे वर्तन करणाऱ्या शिवसेनेला भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी ठणकावले. सत्तेची फळे चाखायची असतील, तर विरोधी पक्षांप्रमाणे वर्तन थांबवावे, अन्यथा विरोधी पक्षात बसावे, असा इशारा दिल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाच वर्षे सत्तेत राहण्याचे आश्वासन दिले आणि पुढील लोकसभा निवडणुकीतही युती हवी, अशी भूमिका घेतल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले. राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला शिवसेना पाठिंबा देणार असल्याचा दावा भाजपच्या सूत्रांनी केला; परंतु उमेदवार पाहूनच पाठिंबा देणार असल्याची भूमिका मांडल्याचे शिवसेना नेत्यांनी स्पष्ट केले. शहा यांच्या भेटीनंतर शिवसेनेत शांतता असली तरी उद्धव ठाकरे आज, सोमवारी आपली भूमिका शिवसेना मेळाव्यात मांडतील व ‘मराठी बाणा’ दाखवितील, असे पक्षातील सूत्रांनी सांगितले.

शहा यांनी रविवारी सकाळी ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीला फारसे राजकीय महत्त्व नसून ती ‘नित्याची बाब’ असल्याचे व शिवसेनेला किंमत देत नसल्याचे शहा यांनी आधीच सूचित केले होते. शिवसेना व भाजपमध्ये गेले काही महिने सतत संघर्ष होत असून शेतकरी कर्जमाफीच्या मुद्दय़ावर शिवसेना आक्रमक आहे. खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी संघटना आणि अन्य शेतकरी संघटनांबरोबर शिवसेना रस्त्यावर आंदोलनात उतरली असून मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गालाही शिवसेना विरोध करीत आहे. एखाद्या मुद्दय़ावर दोन पक्षांत मतभेद असल्यास ते चर्चेतून सुटू शकतात, पण महत्त्वाच्या मुद्दय़ांवर विरोधी पक्षांपेक्षाही भाजपची अधिक कोंडी करणाऱ्या  शिवसेनेला वर्तन सुधारण्याबाबत शहा यांनी रविवारच्या भेटीत सूचना केली. शिवसेनेने सत्तेत राहावे किंवा विरोधी पक्ष म्हणून काम करावे, असा इशारा देण्यात आल्याचे संबंधितांनी सांगितले. ही महत्त्वाची बैठक अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे या तिघांमध्येच झाली. शिवसेनेला सत्तेची फळे चाखावयास मिळाल्याने आता सत्तेतून बाहेर पडण्याची तयारी नाही. त्यामुळे भाजपला पाच वर्षे पाठिंबा देऊ आणि नंतरही निवडणुकीत युती हवी असल्याचे आश्वासन दिल्याचे भाजपमधील सूत्रांनी सांगितले. राष्ट्रपतिपदासाठी रालोआच्या उमेदवाराला पाठिंबा दिला जाईल, त्याचे नाव ठरविण्यात यावे, अशी भूमिका ठाकरे यांनी मांडल्याचे संबंधितांनी स्पष्ट केले. तर भाजपने आधी उमेदवार ठरवून मग रालोआच्या घटकपक्षांशी सल्लामसलत करावी. सरसंघचालक मोहन भागवत, कृषीतज्ज्ञ एम एस स्वामिनाथन यांची नावे शिवसेनेने सुचविल्याचे सेनेतील सूत्रांनी सांगितले. रालोआचा उमेदवार पाहूनच शिवसेना पाठिंबा देईल, असे संबंधितांनी स्पष्ट केले.

आज ‘मराठी बाण्या’चे दर्शन

  • शिवसेना नरमली असल्याचे भाजपमधील सूत्रांचे म्हणणे असले तरी ‘उद्धव ठाकरे हे पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करतील व शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या आज, सोमवारी होणाऱ्या मेळाव्यात आपली भूमिका मांडतील’, असे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले.
  • सोमवारी संध्याकाळी षण्मुखानंद सभागृहात हा मेळावा होणार आहे. तेथे मांडण्यात येणाऱ्या भूमिकेतून उद्धव ठाकरे भाजपला ‘मराठी बाणा’ दाखवतील, असेही सूत्रांनी नमूद केले.

राष्ट्रपतिपदासाठी तत्वत: नव्हे, उमेदवार पाहून पाठिंबा!

  • ‘राष्ट्रपतिपदासाठी रालोआच्या उमेदवाराला पाठिंबा दिला जाईल, त्याचे नाव ठरविण्यात यावे’, अशी भूमिका ठाकरे यांनी मांडल्याचे संबंधितांनी सांगितले. तर, ‘भाजपने आधी उमेदवार ठरवून मग रालोआच्या घटकपक्षांशी सल्लामसलत करावी’, अशी सूचना करीत, ‘सरसंघचालक मोहन भागवत, कृषीतज्ज्ञ एम. एस. स्वामिनाथन यांची नावे शिवसेनेने सुचविली’, अशी माहिती सेनेतील गोटातून देण्यात आली.