भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झाले आहेत. शिवसेनेने या भेटीआधी राजकीय भूमिकेबाबत कठोरपणा दाखवला असला तरी अमित शहा यांच्या स्वागतामध्ये कुठलीही कमतरता ठेवलेली नाही. मातोश्रीवर खास शहा यांच्या आवडीचा गुजराती मेनू ठेवण्यात आला आहे. यामध्ये खांडवा, ढोकळा, फापडा हे गुजराती पदार्थ आहेत. एबीपी माझाने हे वृत्त दिले आहे.

अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. उद्धव यांच्यासोबत आदित्य ठाकरेही या बैठकीला उपस्थित राहतील अशी सूत्रांची माहिती आहे. चौघांमध्ये प्राथमिक चर्चा झाल्यानंतर शहा आणि उद्धव ठाकरेंमध्ये बंद दाराआड २० ते २५ मिनिटे चर्चा होईल अशी माहिती आहे. यामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युती करण्याचा महत्वाचा मुद्दा आहे. भाजपाकडून मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीला कंटाळून शिवसेनेने एकला चलो रे चा नारा दिला आहे.

भविष्यात सर्व निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा शिवसेनेने आधीच केली आहे. शिवसेना आता माघार घेऊन भाजपाशी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी करणार का ? मातोश्रीवरुन आज युतीसाठी सकारात्मक संदेश जाणार का ? याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.

मातोश्रीवर जाण्याआधी शहा यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाजपा-शिवसेना युती होणारच, मित्र पक्षांमध्ये आपसात कुरबुरी होत असतात असे अमित शहा यांनी म्हटले आहे. २०१९ च नाही तर २०२४ ची निवडणूकही शिवसेनेसोबत लढवू. उद्धव ठाकरेंशी चर्चा करुन त्यांची नाराजी दूर करु असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला.