भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आघाडीच्या बड्या नेत्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.  त्यामुळे शहा यांच्या मुंबई भेटीत भाजपच्या राज्यातील ताकदीत आणखी वाढ झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील, काँग्रेसचे माजी खासदार व कै. शंकरराव चव्हाण यांचे जामात भास्करराव पाटील खतगावकर, तसेच पेडन्यूज प्रकरणात अशोक चव्हाण यांना मोठा हादरा देणारे माजी राज्यमंत्री डॉ. माधव किन्हाळकर या तिघा बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
अमित शहा गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. शिवसेनेकडून अमित शहा यांना भेटीसाठी बुधवारी निमंत्रण पाठविण्यात आले होते. त्याचा शहा यांनी स्वीकार केला असून, गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता ते उद्धव ठाकरेंना भेटतील, असे तावडे म्हणाले. दरम्यान, अमित शहा दुपारी साडेचार वाजता शिवाजी पार्क येथे दाखल झाले आणि दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले.
मुंबई भेटीदरम्यान अमित शहा ‘मातोश्री’वर जाणार नसल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये अस्वस्थतेचे वातावरण होते. भाजप आणि शिवसेना या दोन्ही मित्र पक्षांमधील अंतरही वाढत चालल्याचे चित्र होते. त्यातच काही शिवसैनिकांकडून बुधवारी ‘शहाणा हो’ असा संदेश देणारे पोस्टर सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आले. या सर्व घडामोडींनंतर बुधवारी शिवसेनेकडून अमित शहा यांना ‘मातोश्री’ला भेट देण्याचे निमंत्रण देण्यात आले. मात्र, शहा यांनी तातडीने त्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. गुरुवारी सकाळी मुंबईत आल्यावर भाजपच्या राज्यातील कोअर समितीची बैठक तावडे यांच्या निवासस्थानी पार पडली. त्यानंतर लगेचच तावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन शहा ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांच्या भेटीला जाणार असल्याचे सांगितले. अमित शहा गुरुवारी संध्याकाळी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन तिथे श्रद्धांजली वाहणार आहेत, असेही तावडे यांनी सांगितले.