मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा नातू रोहित पवार हे दोघे मुंबईत लंचसाठी एकत्र आले होते. मुंबईतल्या फिनिक्स मिल कंपाऊंडमध्ये असलेल्या इंडिगो हॉटेलमध्ये या दोघांनी दुपारचं जेवण सोबत केलं. जेवणाच्या निमित्ताने या हे दोघे सव्वा तास एकत्र होते, मात्र या दोघांमध्ये काय चर्चा रंगली? काय विषय होता हे समजू शकलेले नाही. एका मराठी वृत्तवाहिनीने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. सप्टेंबर महिन्यात ही निवडणूक पार पडू शकते. तूर्तास तरी यासंदर्भातली तारीख निवडणूक आयोगाने जाहीर केलेली नाही. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या दोन महत्त्वाच्या नेत्यांच्या मुलांनी सोबत येऊन साधलेला संवाद हा चर्चेचा विषय ठरतो आहे. लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान राज ठाकरे यांनी भाजपाच्या विरोधात प्रचार केला. एकूण दहा सभा घेऊन त्यांनी मोदी आणि अमित शाह यांना लक्ष्य केले. मात्र त्या सभांचा परिणाम झालेला पाहण्यास मिळाला नाही. कारण भाजपा आणि शिवसेना युतीला ४१ जागा मिळाल्या आहेत. आता विधानसभा निवडणुकीसाठी काय रणनीती असेल हे या दोघांनी ठरवले आहे का? हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अमित ठाकरे हे त्यांच्या वडिलांच्या म्हणजेच राज ठाकरेंच्या सभेला आवर्जून हजर असतात. मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये मिसळून ते राज ठाकरेंची सभा, त्या सभेला मिळणारा प्रतिसाद या सगळ्या गोष्टींचे निरीक्षण करत असतात. त्याचप्रमाणे शरद पवारांचे नातू रोहित पवार हेदेखील सतत त्यांच्यासोबत असतात. शरद पवारांनी महाराष्ट्रातला दुष्काळ दौरा केला तेव्हाही रोहित पवार त्यांच्यासोबत होते. आज मुंबईतल्या फिनिक्स मिलमध्ये या दोघांनी दुपारच्या जेवणानिमित्त भेटणं पसंत केलं. आता या दोघांमध्ये काय चर्चा झाली ? ते समजू शकलेले नाही. मात्र हे दोघे भेटल्याची चर्चा मात्र राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.